Breaking News

पाणीपुरवठा अभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर सरपंचांचे उपोषण मागे

अलिबाग : प्रतिनिधी

रेवस पाणीपुरवठा योजनेतील झोन 1 मध्ये समाविष्ट होणार्‍या कोप्रोली, मिळखतखार, सारळ, नवखार आणि रेवस या पाच ग्रामपंचायतींमधील गावकर्‍यांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण असह्य झाल्याने स्वातंत्र्य दिनी या पाच ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी रविवारी (दि. 15) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले. पाणीपुरवठा अभियंत्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सर्व सरपंचांनी उपोषण मागे घेतले. कधी 15-15 दिवस तर कधी महिन्यातून एकदा रेवस पंचक्रोशीतील गावांना रेवस योजनेचे पाणी दिले जाते. उन्हाळ्यात भेडसावणारी पाणीटंचाई आता भर पावसाळ्यातदेखील भेडसावत असल्याने सहनशीलता संपली आणि पाचही ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी पाण्यासाठी चक्क उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रेवसचे सरपंच मच्छिंद्र पाटील, सारळचे उपसरपंच संजय पाटील, माजी सरपंच अमित नाईक, मिळखतखार सरपंच गिरीष पाटील, उपसरपंच हिमांशु पोवळे, डावली रांजणखार उर्फ नवखार सरपंच हेमंत पाटील, गजानन भगत यांनी रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सारळचे माजी सरपंच अ‍ॅड. अनंत पाटील, जगन्नाथ पाटील, दर्शना पाटील, कुंदा ठोंबरे, आशा कडवे, शिल्पा घरत, महेश ठोंबरे, सुरेंद्र पाटील, अल्पेश कडवे, प्रगती बरे, वैशाली पाटील, प्रमोद पाटील, सुधा पाटील, वीरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. दुपारी उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना सद्यस्थिती सांगितली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद येजरे आणि उपअभियंता कुदळे यांना उपोषणकर्त्या सरपंचांच्या पाणीप्रश्नाची तत्काळ दखल घेण्याची सूचना केली. या पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करून लवकरच सुरळीत पाणी देण्याचे लेखी पत्र कार्यकारी अभियंता अरविंद येजरे आणि उपअभियंता श्री. कुदळे यांनी दिले. त्यानंतर या सरपंचांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, तूर्तास उपोषण मागे घेतले असले, तरी पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोनल करण्याचा निर्णय या ग्रामस्थांनी घेतला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply