नागोठणे : प्रतिनिधी
येथील दिव्यांग तलवारबाजपटू संदीप गुरव याची 15 ते 23 सप्टेंबरदरम्यान दक्षिण कोरियात होणार्या व्हीलचेअर तलवारबाजी वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी देशभरातील सहा खेळाडूंची निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातील दोघांचाच समावेश आहे.
संदीप गुरव यांनी आतापर्यंत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर तलवारबाजी व अन्य विविध खेळांमध्ये पदके संपादित केली आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना नुकताच राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सर्वोच्च असा शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय शासनाच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयाकडून 2012 सालातील गुणवंत खेळाडू म्हणून, तर रायगड जिल्हा परिषदेकडून रायगडभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विविध पुरस्कार, सन्मान त्यांना लाभले आहेत.
2015 साली दुबई येथे झालेल्या जागतिक व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत व एशियन बीच गेममध्ये भारतीय ऑलम्पिक संघाचे संदीप गुरव यांनी प्रतिनिधित्व केले होते. व्हीलचेअर तलवारबाजी हा खेळ खर्चिक असून, वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होण्यासाठी एकूण 3 लाख 51 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. गुरव आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे त्यांना समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांकडून आर्थिक सहकार्याची अपेक्षा आहे. तसे आवाहन त्यांनी केले आहे.