Friday , September 29 2023
Breaking News

सुधागडातील धबधबे पर्यटकांनी फुलले

धरणांच्या सांडव्यांवरही होतेय चिंब भिजण्यासाठी गर्दी

पाली : प्रतिनिधी

पावसाळा आला की डोंगरमाथ्यावर व निसर्गाच्या कुशीतून पांढरे शुभ्र, दुधारी व फेसाळणारे धबधबे सर्वांनाच मोहीत करतात. जोरदार पाऊस झाल्यामुळे सुधागड तालुक्यातील अनेक धबधबे कोसळू लागले आहेत. धरणांचे सांडवे वाहू लागले आहेत. ते पर्यटकांना आकर्षित करु लागले आहेत. दूरवर धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यापेक्षा मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील  पर्यटक सुधागड तालुक्यातील सुरक्षित धबधबे, ओढे व धरणे यांना पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक पसंती देत आहेत.

सुधागड तालुक्यातील उद्धर, सिद्धेश्वर, भावशेत, आपटवणे, नाडसूर व पडसरे येथील धबधबे, तसेच उन्हेरे, कवेळे व कोंडगाव येथील धरणांच्या ओसंडून वाहणार्‍या पाण्यात मौजमजा घेण्यासाठी पर्यटक गर्दी करु लागले आहेत. पाली-खोपोली मार्गावरील जंगलीपरीनजीकच्या डोंगरपठारावरुन कोसळणारे धबधबेही पर्यटकांना खुणावू लागले आहेत.

सुधागड तालुक्यातील विविध ठिकाणचे धबधबे खुपच आकर्षक आहेत. दूरवर कोठेही पावसाळी पर्यटनासाठी जाण्यापेक्षा येथे जावून चिंब भिजण्याचा आनंद घेता येतो. तसेच निसर्गाशी एकरुपदेखील होता येते. शनिवार, रविवारी व सुट्टीच्या दिवशी तेथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येवू लागले आहेत. मात्र पर्यटकांनी अती उत्साह टाळावा व येथे मद्यप्राशन व  कचरा करु नये. पोलिसांनीदेखील अशा ठिकाणी गस्त घालणे किंवा बंदोबस्त ठेवणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.

पावसाळ्यात जे धोकादायक धबधबे आणि धरणक्षेत्र आहेत तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. सोमवारी पोलीस, उत्पादनशुल्क, महसूल विभाग आणि गटविकास अधिकारी यांची बैठक झाली. त्यानुसार तालुक्यातील उन्हेरे, कवेळे व कोंडगाव धरण तसेच पडसरे धबधबा येथे पोलीस गस्ती पथक नेमण्यात येणार आहे. उत्पादनशुल्क विभाग जवळच्या बियर शॉपी आणि वाईन्स शॉपवर लक्ष ठेवणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीमार्फत तेथे धोकादायक सूचना फलक लावले जाणार आहेत.

-दिलीप रायन्नावर, तहसीलदार, पाली-सुधागड

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply