पर्यावरणपूरक मूर्ती, फोटोकॉपीप्रमाणे गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध



कर्जत : बातमीदार
प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील गणेशभक्तांत नेरळ येथील गणेशमूर्ती बनविणारा कारखाना प्रसिद्ध आहे. फोटोकॉपीप्रमाणे गणेशमूर्ती बनविणारा कारखाना अशी ओळख असलेल्या या कारखान्यात केवळ पर्यावरणपूरक शाडू मातीपासून मूर्ती बनविल्या जातात. कर्जत तालुक्यात शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे निवडक कारखाने आहेत. त्यात नेरळ कुंभारवाड्यातील दहिवलीकर यांचा पूर्वीचा श्री गणेश कलाकेंद्र आणि आताचा सिद्धेश गणेश कला केंद्र हा कारखाना आघाडीवर आहे. या कारखान्याला 70 वर्षांची परंपरा आहे. केवळ शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचा हा कारखाना कर्जत, पनवेल भागातील गणेशभक्तांना जवळचा वाटतो, तसा तो ठाणे जिल्ह्यातील गणेशभक्तांनाही आपला वाटतो. वामन कुंभार यांनी 70 वर्षांपूर्वी नेरळमध्ये शाडूच्या मूर्ती बनविण्याचा कारखाना सुरू केला. त्या वेळी त्यांच्यासोबत नारायण रामा दहिवलीकर आणि हरिभाऊ तुकाराम दहिवलीकर हे शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवायचे. आज दहिवलीकर यांची तिसरी पिढी शाडूच्या मातीपासून मूर्ती घडवत आहेत. त्यात महिलादेखील आघाडीवर असून त्या प्रामुख्याने रंगकाम करतात. दहिवलीकर यांच्या सिद्धेश कला केंद्रामध्ये एप्रिल महिन्यापासून गणेशभक्तांची ये-जा सुरू होते. त्याचे कारण म्हणजे फोटोप्रमाणे गणेशमूर्ती बनवून दिल्या जातात. फोटोप्रमाणे अगदी हुबेहूब गणेशमूर्ती बनवून मिळत असल्याने नेरळचे मिलिंद दहिवलीकर आणि प्रमोद दहिवलीकर हे प्रसिद्ध आहेत. सिद्धेश कला केंद्रामध्ये आता गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवला जात आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तेथे सर्वांची लगबग सुरू आहे. रवींद्र दहिवलीकर, मिलिंद दहिवलीकर, सिद्धेश दहिवलीकर, प्रमोद दहिवलीकर, प्रशांत दहिवलीकर, विनायक दहिवलीकर यांच्यासह मिताली दहिवलीकर, रंजना दहिवलीकर, विद्या गोरे, रिभा वारगावकर यांचे हात गणेशमूर्तींवरून फिरत आहेत.