गणेश भक्तांमध्ये घबराट
महाड : प्रतिनिधी
एल अॅण्ड टी या ठेकेदार कंपनीने ’आगे पूल कमजोर है’ असा खोटा फलक लावून मुंबई-गोवा महामार्गावरील गांधारी नदीवरील मजबूत पुलाला कमजोर ठरविले आहे. यामुळे कोकणात जाणार्या- येणार्या गणेशभक्तांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, सदर पूल हा वाहतुकीसाठी मजबूत असून त्याला कोणताच धोका नाही, असा खुलासा महामार्ग विभागाकडून करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर छोटे मोठे असे जवळपास 350 पूल आहेत. त्यातील सावित्री (राजेवाडी), गांधारी नदीवरील (मोहोप्रे) हे दोन महत्त्वाचे व मोठे पूल महाड तालुक्याच्या हद्दीत आहेत. सावित्री पूल दुर्घटनेनंतर सरकारने या सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांच्या मजबुतीचा अहवाल जाहीर केला होता. त्यानुसार गांधारी नदीवरील मोहोप्रे पुलाला कोणताच धोका नसल्याचे स्पष्ट झाले होते, मात्र 6 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत या पुलाला तडे गेले. पूल धोकादायक, पूल कधीही कोसळणार अशा आशयाचे खोटे मेसेज व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. त्यावेळीदेखील महामार्ग बांधकाम विभागाने पाहणी करून पुलाला कोणताच धोका नसल्याचे स्पष्ट केले होते.दरम्यान, महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणार्या एल अॅण्ड टी या कंपनीने कोणतीही चौकशी अथवा बांधकाम विभागाची परवानगी न घेता या पुलाच्या दोन्ही बाजूला ’आगे पूल कमजोर है’ अशा आशयाचा फलक लावला आहे. या फलकामुळे गौरीगणपतीच्या सणासाठी कोकणात जाणार्या गणेशभक्तांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणी उपकार्यकारी अभियंता महामार्ग विभागाच्या महाड कार्यालयात अधिक चौकशी केली असता सदर गांधारी पूल मजबूत असून पुलाला कोणताच धोका नसल्याचे शाखा अभियंता अमोल महाडकर यांनी या वेळी सांगितले.
आम्हाला महामार्ग विभाग पेण अथवा ऑथर्टी इंजिनीअर हायवेने पूल कमजोर असल्याचे कोणतेच लेखी पत्रक दिले नसले तरी वाहनांचा वेग कमी राहावा यासाठी हा फलक लावण्यात आला आहे. प्रवाशांत घबराट होणार असेल तर हा फलक काढून घेऊ.
-श्री. नायडू, प्रकल्प अधिकारी, एल अॅण्ड टी