मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील राजापुरी बंदरात असणार्या सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिडांच्या बोटीची गुरुवारपासून (दि. 29) सुरुवात झाली. पाऊस आणि वार्याचा वेग कमी झाल्याने प्रशासनाने या किल्ल्यावर जाण्यासाठी जलवाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. 13 शिडांच्या बोटींमधून सदरची प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा 22 एकर परिसरात असून या किल्ल्याला 22 बुरूज आहेत. चोहूबाजूने समुद्राचे खारे पाणी असतानाही किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत. कलाल बागडीसारखी महाकाय तोफ आहे. हा किल्ला समुद्रात असल्याने पर्यटकांना याचे विशेष आकर्षण आहे. पावसाळी हंगामात या किल्ल्यावर जाणारी जलवाहतूक बंद ठेवण्यात येते. वर्षभरात सुमारे पाच लाख पर्यटक या किल्ल्यास भेट देत असतात. गणेशोत्सव संपताच पर्यटक या ठिकाणी गर्दी करतील असा अंदाज आहे.
जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना ने-आण करण्यासाठी जंजिरा पर्यटक जलवाहतूक सोसायटी आणि वेलकम सोसायटी यांच्या एकूण 13 शिडाच्या बोटींना परवानगी देण्यात आली आहे. एका शिडाच्या बोटीमध्ये 22 व्यक्तींनाच प्रवास करता येणार आहे. आगरदांडा व खोरा बंदरातून पर्यटकांना किल्ल्यावर आणण्यासाठी यांत्रिकी बोटी असून त्यांना 1 सप्टेंबरपासून परवानगी देण्यात येणार आहे. बोर्डातील प्रत्येक कर्मचारी या जलवाहतुकीवर लक्ष ठेवणार आहे.
-यशोधन कुलकर्णी, सहाय्य्क बंदर निरीक्षक, मेरीटाइम बोर्ड, राजपुरी