अलिबाग ः प्रतिनिधी
आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त आतुर झाले असून त्याच्या स्वगताची तयारी करण्याची लगबग सध्या सुरू आहे. सोमवारी (दि. 2) गणेशाचे घरोघरी आगमन होणार आहे. गणेशोत्सवासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात आज अक्षरशः झुंबड उडाली होती. रायगड जिल्ह्यात 277 ठिकाणी सार्वजनिक, तर एक लाख एक हजार 325 घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. 24 ठिकाणी एक गाव एक गणपती आहे.
रायगड जिल्ह्यात आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी काही दिवस आधीपासून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आरास केली जात आहे. या वर्षी थर्माकोलच्या मखरांना पर्याय म्हणून कागदाचे, पुठ्ठ्याचे, तसेच लाकडी मखरांना भाविकांनी पसंती दिली आहे, तर सार्वजनिक मंडळांकडून सामाजिक, पौराणिक देखावे साकारण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे भाविकांचा कल असल्याचे पाहायला मिळत आहे.
या वर्षी गणेशोत्सवात पावसाचा व्यत्यय आला असला, तरी भाविकांनी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. आवश्यक साहित्यांनी रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा फुलल्या आहेत. लाडक्या बाप्पांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली आहे. गणेशोत्सवासाठी आरास, सजावटीचे साहित्य, तसेच पूजेसाठी, शोभेसाठी फुले, फळे यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गौरीपूजेसाठी लागणारी सुपेही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यंदा महागाईचा फटका गणेशभक्तांना बसतो आहे. प्रसाद, मोदक यांचे भाव किलोमागे 50 रुपयांनी वाढले आहेत, तर फळांचा भावदेखील वधारला आहे.