Breaking News

शिकवण!

आज गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाल्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. श्रीगणेश म्हणजे विद्येचा दाता. याच्या आगमनाने सगळीकडे  चैतन्य पसरले आहे. लहानथोर सगळे आपापल्या परीने गणेशोत्सव साजरा करीत आहेत. आज मुलांना अभ्यासाची गोडी नाही. मुलांच्यात खोटे बोलण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रामाणिकपणा नाही, असे म्हणत असतानाच आठवड्यापूर्वीची एक घटना समोर आली. एक गरीब कुटुंबातील मुलगा वडील अभ्यास करू देत नाहीत म्हणून पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार करायला गेला होता. यावरून हे लक्षात येते की आजही लहान मुलांच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास आहे की त्यांच्याकडे तक्रार केल्यावर ते आपली मदत करतील आणि पोलिसांनीही तो विश्वास खरा ठरवला.

जळगाव जिल्ह्यातील एका शहरातील पोलीस ठाण्यात एक 10-12 वर्षाचा मुलगा हाफ पँट-बनियनवर आला आणि तेथील पोलिसांना आपला बाप अभ्यास करू देत नाही, जोरात टीव्ही लावून बसतो, अशी तक्रार करू लागला. पोलिसांना काय करावे समजेना, पण तो मुलगा आपली तक्रार घ्या म्हणून हट्ट धरून बसल्याने त्यांनी या मुलाला आपल्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे नेले. अधिकार्‍यालाही नवल वाटले एक लहान मुलगा बाप अभ्यास कर म्हणून ओरडतोय अशी तक्रार न करता उलट अभ्यास करून देत नाही म्हणून तक्रार करतोय. त्या अधिकार्‍याने मुलाजवळ चौकशी केली. त्या वेळी आपला बाप दारू पिऊन येतो आणि आईला मारतो. टीव्ही मोठ्या आवाजात लावतो. आपल्याला अभ्यास करू देत नाही. त्याला पकडा, असे तो सांगत होता.

त्यांनी पोलिसांना पाठवून त्याच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. टीव्हीचा आवाज कमी ठेवून मुलाला अभ्यास करू द्या म्हणून सांगितलेच, पण त्या अधिकार्‍याने त्या मुलाला दुकानात नेऊन नवीन कपडे आणि बूटही घेऊन दिले. त्यामुळे त्याच्या मनात पोलिसांबद्दल आदर निश्चितच वाढला असेल.  ये मेरा नही है, मै नही लुंगी। एक 5-6 वर्षाची चिमुरडी नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक कट्ट्याजवळ सांगत होती. आज करोडोंचे घोटाळे करून विदेशांत पळून जाणार्‍यांबद्दल आपण ऐकत असताना एका चिमुरडीचे बोल हे ऐकून आजही भावी पिढीकडे प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे दिसून येत होते. नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक कट्ट्याजवळ रोशनी यादव (वय 5-6) आपली छोटी बहीण गंगाला तेथील नळाच्या पाईप लाईनच्या एअर व्हॉलमधून येणारे पाणी प्लॅस्टिकच्या बरणीत  भरून आंघोळ घालीत होती. जवळच आई-वडील दारू पिऊन पडले होते.

रोशनीचे आपल्या लहान बहीण गंगाला मोठ्या बाईसारखे आंघोळ घालताना पाहून जाणार्‍या-येणार्‍यांना कौतुक वाटत होते. ती आंघोळ घालून गंगाला घेऊन आई-वडील होते तिथे घेऊन गेल्यावर त्या ठिकाणी एक पिशवी दिसली. त्या मुलीची पिशवी विसरली असेल, असा समज तेथील ज्येष्ठ नागरिकांचा झाला. रोशनी थोड्या वेळाने तिथे आल्यावर ज्येष्ठ नागरिकांनी तिला त्या पिशवीबद्दल सांगितले. तिने त्या ठिकाणी जाऊन पाहिले आणि  ती पिशवी आपली नसल्याचे सांगितले. कोणी तरी ती पिशवी उचलून उघडून पहिले. त्यामध्ये बूट होते. तिला ते घेऊन जाण्यास सांगितले. या वेळी तिने ये मेरा नही है, मै नही लुंगी। असे सांगितले. एवढे चांगले बूट मिळाल्यावर कोणीही घेतले असते, पण रोशनीने ते बूट आपले नसल्याने  घेण्यास नकार दिला. याचे सगळ्यांनाच  कौतुक वाटले.

रोशनी पनवेलच्या पुलाजवळच्या प्रायमरी स्कूलमध्ये शिकत असल्याचे तिने सांगितले. वडील राजू यादव मूळचे गुजरात मधील सुरतचे. कामधंद्यासाठी कुटुंबासह मुंबईला आलेले. आई-वडील रोज भंगार गोळा करून विकतात. त्यातून आलेल्या पैशातून दोन वेळ पोटभर खायला मिळायची मारामार. त्यातच आई-वडिलांना दारूचे व्यसन लागलेले. रोज रात्री फुटपाथवरच हे कुटुंब राहत आहे. अशा अवस्थेत रोशनीचा हा प्रामाणिकपणा नक्कीच कौतुकास्पद आहे. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी या दोन्ही मुलांना गणपतीबाप्पाने प्रसन्न होऊन त्यांना चांगली विद्या देऊन मोठे करावे हीच प्रार्थना!

-नितीन देशमुख, फेरफटका

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply