
कर्जत : बातमीदार
संततधात पावसामुळे कर्जत तालुक्यातील तुंगी गावामधील चंद्रकांत सुपे यांचे कौलारू घर गुरुवारी कोसळले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी घराचे प्रचंड नुकसान झाल्याने सुपे कुटुंबियांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सततचा मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वार्यात कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरे कोसळून प्रचंड नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि. 2) तुंगी गावातील चंद्रकांत सुपे यांचे कौलारू घर जमीनदोस्त झाले असून, त्यात मोठे नुकसान झाले आहे. या अगोदर मोरेवाडी तसेच बेकरे धनगर येथेही घर कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. तुंगी हे गाव आधीच दरड कोसळण्याच्या छायेत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच चंद्रकांत सुपे यांचे घर कोसळल्याने ग्रामस्थांची भीती अधिकच वाढली आहे. संपूर्ण घर कोसळून कौले आणि भिंती जमीनदोस्त झाल्या आहेत. त्याची पाहणी करून महसूल विभागाने पंचनामा करावा, अशी मागणी सुपे कुटूंबियांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.