कृतियुक्त शिक्षणाचा आनंददायी अनुभव
पनवेल : प्रतिनिधी
आठवडी बाजार तर सगळीकडे नेहमीच भरतो. त्यावरून आपल्या महापालिका हद्दीत वाद ही सुरू आहेत पण उसर्ली खुर्द येथे भरलेल्या बाजारात मात्र आठवडी बाजारात मिळणार्या सगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीला होत्या, खरेदीला गिर्हाईकांची गर्दी होती. येथे भांडणे नव्हती की, गिर्हाईकांची फसवणूक नव्हती आणि हो येथे दुकानदार मात्र नेहमीचे नव्हते येथे होते बाल विक्रेते. जागतिक गणित दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषद शाळा उसर्ली खुर्द येथे बुधवारी (दि. 4) बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. गणितीय संकल्पना विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजाव्यात बेरीज-वजाबाकी नाणी व नोटा यांची ओळख व्हावी. खरेदी-विक्री नफा-तोटा हिशोबाची मांडणी सुटे-बंदे पैसे, व्यावसायिक कौशल्य या अशा अनेक संकल्पनाच्या पूर्तीसाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम अर्थात बाल बाजार आयोजित करण्यात आला होता. केंद्रप्रमुख अंकिता हुद्दार यांचे मार्गदर्शनाखाली दुकानांच्या मांडणी मधून भौमितिक आकार आणि संकल्पनेप्रमाणे करून त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. या बाल बाजाराचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मनीषा वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी उपसरपंच प्रसाद भगत, माजी सरपंच प्रमिलाताई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भगत, उपाध्यक्ष अस्मिता घाडगे, ग्रामसेवक ढेरे, तलाठी घरत, नरेश पाटील आणि कोळी उपस्थित होते. या सर्वांनी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी बाजार फिरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि खरेदी सुद्धा केली. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी स्वतःच्या दुकानांची आणि सामानाची व्यवस्थित मांडणी करुन आलेल्या गिर्हाईकांना व्यवस्थितपणे स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने पदार्थ आणि भाजीपाला व्यवस्थित देणे, त्यांच्याशी सुसंवाद साधणे, पैशाचा व्यवहार अचूक करून आलेल्या पैशाची व्यवस्थित नोंद हे बाल विक्रेते सहज करीत होते. इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी खरेदी-विक्रीचा आनंद मिळवलाच पण त्यामुळे गणितीय संकल्पना अगदी हसत खेळत विद्यार्थ्यांमध्ये रूजली. या विक्रीतून मिळालेला नफा बचत बँकेत ठेवून नंतर शैक्षणिक सहल किंवा साहित्यासाठी वापरू असे विद्यार्थ्यांनी सांगितले. उसर्ली खुर्द शाळेच्या मुख्याध्यापक प्रगती म्हात्रे, शिक्षक सुनिता काळे, चित्ररेखा जाधव, वैशाली अंबुर्ले, सारीका घाडगे, अंगणवाडीताई शकुंतला, कल्पना ताईंनी बाल बाजार यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.