Breaking News

हा एसटीची मालमत्ता हडप करण्याचा डाव

अ‍ॅड. महेश मोहिते यांचा ठाकरे सरकारवर आरोप; संपकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत भाजप संघर्ष करणार

पेण : प्रतिनिधी

महामंडळास डबघाईस आणून एसटीची कोट्यावधींची मालमत्ता खाजगीकरणाच्या माध्यमातून घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव असून, त्यासाठी कर्मचार्‍यांना वेठीस धरून आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे गरीब एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे, असा आरोप भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी आज प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला.

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. मोहिते यांनी आज एक पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.वेळेवर वेतन मिळत नसल्याने कुटुंबाची घडी विस्कटत असताना ठाकरे सरकार मात्र संपकरी एसटी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांसोबत आता भाजपही राज्य सरकारशी संघर्ष चालू ठेवील, असा इशारा अ‍ॅड. महेश मोहिते यांनी या प्रसिध्दी पत्रकात दिला आहे.

संकटग्रस्त जनता, अन्यायग्रस्त शेतकरी, अत्याचारग्रस्त महिला, दुर्लक्षित विद्यार्थी आणि नोकरभरतीच्या नाटकात फसलेले उमेदवार यांच्या रांगेत आता राज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांनाही बसविले असून, फसवणुकीच्या खेळासाठी नवे खेळणे म्हणून एसटी कर्मचार्‍यांना वेठीस धरले जात असल्याचे अ‍ॅड. मोहिते यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी केवळ ‘बहुजन हिताय’ या भावनेने तुटपुंज्या पगारात जनतेची सेवा करताना कौटुंबिक समस्यांची पर्वा केली नाही. मात्र, ठाकरे सरकारने त्याची साधी दखलही घेतली नाही. उलट संप संपविण्यासाठी आता पोलिसी बळाचाही वापर करून दडपशाही सुरू केल्याने कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण आहे, असा आरोप त्यांनी केला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply