मुंबई ः प्रतिनिधी
गणरायाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाल्यानंतर शहरातील चाकरमान्यांनी कोकणाकडे धाव घेतली. शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर एसटी आगारातून 1854 एसटी बसे कोकणासाठी रवाना करण्यात आल्या, तसेच शेकडो नियमित आणि विशेष मेल-एक्स्प्रेस आणि हजारो खाजगी बसेस कोकणासाठी मार्गस्थ झाल्या. खाजगी बसचालकांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यात परिवहन विभागाला पूर्णपणे अपयश आले आहे. उत्सवापूर्वी शेवटचा शनिवार-रविवार असल्याने खाजगी बसचालकांनी रत्नागिरीसाठी दोन हजार रुपये तिकीट आकारण्यास सुरुवात केली होती. राज्यातील विविध भागातील बस मुंबईतील आगारांत गुरुवारीच दाखल झाल्या. या बसमधील चालक आणि वाहकांच्या राहण्याची व्यवस्था लालबाग येथील शाळेत करण्यात आली. विठाई या संस्थेतर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.