कर्जत : बातमीदार
ऐन गणेशोत्सवात माथेरानमध्ये सर्वत्र नळाद्वारे लाल रंगाचे गढूळ पाणी येत असून, ते बघून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शुद्ध पाणी देण्यासाठी संबंधित अधिकार्यांना सद्बुद्धी दे, असे साकडे काही नागरिकांनी गणरायाला घातले आहे. दरम्यान, नगरपालिकेने क्लोरिनच्या बाटल्या घराघरांत पोहोच केल्या आहेत, पण त्याची मात्रा माहीत नसल्याने काहींच्या घरात त्या पडून आहेत. माथेरानला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा होतो. येथे ब्रिटिश काळापासून पाणी शुद्धिकरण केंद्र असून, एक नवीन जलशुद्धिकरण केंद्रही उभारले आहे, मात्र जलशुद्धिकरण केंद्र असूनही माथेरानमधील नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठ्यास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना डायरिया, कावीळ, टायफाईडसारख्या आजारांना सामोरे जावे लागतेय की काय, अशी भीती व्यक्त होत आहे, मात्र याचे जीवन प्राधिकरणाला गांभीर्य नाही, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
माथेरानला जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे शारलोट तलावाची गढूळता वाढली आहे. ब्रिटिशकालीन जलशुद्धिकरण केंद्र हे खूप जुने झाले असल्याने आम्ही नवीन केंद्र उभारले आहे, पण ते आताच बनविल्यामुळे त्यावर स्वच्छ करण्याच्या प्रक्रिया चालू आहेत. सध्या जे पाणी माथेरानला मिळत आहे, ते शरीरासाठी घातक नाही.
-राजेंद्र हावळ, उपअभियंता,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कर्जत विभाग
गणेशोत्सव असल्याने आमच्या घरी पाहुणे मंडळी आली आहेत. आम्ही त्यांना गढूळ पाणी देत आहोत, ही आमच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. एमजेपी आमच्याकडून अमाप पाणीपट्टी आकारते व पिण्यासाठी गढूळ पाणी देते. एमजेपी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.
-अपर्णा घावरे, गृहिणी, माथेरान