Breaking News

महाडमधील नाल्यात आढळले मृत मासे ; पावसाच्या पाण्याआड कारखान्यांचे प्रदूषित पाणी

महाड : प्रतिनिधी    

येथील औद्योगिक क्षेत्रातील नाल्यात गेल्या दोन दिवसांपासून मृत मासे दिसून येत आहेत. सातत्याने पडणार्‍या पावसाचा फायदा घेऊन रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याने हे मासे मृत पावले असावेत, असा प्राथमिक अंदाज प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाड आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. गणेश विसर्जनानंतर हे प्रमाण कमी झाले असले तरी पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रातील नालेदेखील तुडूंब भरून वाहू लागले आहेत. साफसफाई न झाल्याने महाड एमआयडीसीमधील गटारेही वाहू लागली आहेत. याचा फायदा घेत काही कंपन्यांनी रासायनिक सांडपाणी थेट या गटारात सोडण्याचा उद्योग सुरू केला आहे. शिवाय कंपनीच्या आवारातील पावडर, खाली पडणारे द्रवयुक्त रसायनदेखील पावसाच्या पाण्याबरोबर  वाहत येऊन गटाराला मिळत आहे. यामुळे महाड औद्योगिक परिसरात काही ठिकाणी नाल्यात मृत मासे आढळून येत आहेत. या एमआयडीसीच्या ‘सी‘ झोनमधील नाल्यात हे मासे आढळून आले आहेत.

 महाड एमआयडीसीमधील रासायनिक सांडपाणी सोडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध आहे. तरीही काही कंपन्यांच्या आवारात किंवा परिसरात सांडपाणी आढळून येत आहे. पावसाचा फायदा  छोट्या कंपन्यांनी घेतला असावा आणि यातूनच हे मासे मृत झाले असण्याची शक्यता महाड औद्योगिक क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

गटारात मृत मासे असल्याची माहिती मिळताच पाहणी केली, शिवाय तेथील पाण्याचे नमुने घेतले, मात्र पावसाचे पाणी अधिक असल्याने पाण्यात रासायानिक अंश दिसून येत नाही. पावसाचा फायदा घेत रासायनिक सांडपाणी सोडल्याने हे मासे मृत पावले असावेत.

– सा. वि. औटी, उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply