Breaking News

निसर्ग चक्रीवादळ आज रायगड जिल्ह्यात धडकणार

किनारपट्टीवर विशेष दक्षता

अलिबाग : प्रतिनिधी
अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ बुधवारी (दि. 3) रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात धडकणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले असून, किनारपट्टीच्या गावांमधील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.
निसर्ग चक्रीवादळ 3 जून रोजी हरिहरेश्वर येथे धडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, परंतु हे वादळ आता अलिबागच्या दिशेने सरकले आहे. ते बुधवारी दुपारी 12.30 वाजता अलिबाग किनार्‍यावर धडकणार आहे. या वादळाचा वेग ताशी 125 किमी असेल. वादळाचा जमिनीवर प्रवेश झाल्यानंतर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) तीन पथके अलिबागमध्ये तैनात करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे श्रीवर्धन येथे एनडीआरएफचे एक, मुरूड येथे तटरक्षक दलाचे एक, तर उरण येथे नागरी सुरक्षा दलाचे एक पथक तैनात आहे.
जिल्ह्यात किनारपट्टीवर 62 गावे आहेत. येथे सुमारे एक लाख 73 हजार लोक राहतात. त्या सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खबरदारीची उपाय योजना म्हणून जिल्ह्यातील अलिबाग, उरण, श्रीवर्धन, मुरूड या तालुक्यांमधील कोळीवाड्यात कच्च्या घरांमध्ये राहणार्‍या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, तर धोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय पाच हजार 668 मच्छीमार बोटी किनार्‍यावर आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत 02141-222118 अथवा 1093 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
वीजपुरवठा होणार खंडित
वादळानंतर ताशी 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहणार आहेत तसेच पाऊसदेखील पडणार आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून किनारपट्टीच्या गावांमधील वीजपरवठा खंडित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लोकांनी बुधवारी
घरातून बाहेर पडू नये. जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply