महाड : प्रतिनिधी
येथील क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठानतर्फे 1942मध्ये काढण्यात आलेल्या किसान मोर्चाचा 77वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या वेळी शहरातील सर्व हुतात्म्यांच्या आहुतीस्थळांच्या ठिकाणी जाऊन प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले, तसेच महाडमधील नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेश दिला.
क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठान, महाड नगर परिषद आणि शिवतांडव ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संत रोहिदासनगर गणपती मंडळ, नूतन मित्र मंडळ, सरेकर आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबट आळी गणेश मंडळ, कोहिनूर मित्रमंडळ, जुनी पेठ गणेश मंडळ आदी गणेश मंडळांच्या ठिकाणी जाऊन कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांचे प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी प्रबोधन केले. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहित पाटील, सचिव अमर ननावरे, उपाध्यक्ष नीरज चौधरी, सदस्य रूपेश देवळेकर, सचिन वडके, पत्रकार दिलीप अंबावले, नगरसेवक प्रमोद महाडिक, बंटी पोटफोडे, कल्पेश पाटील, सिद्धेश जाधव आदी उपस्थित होते.