Breaking News

भाजपमध्ये चैतन्याची लाट

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल अशी स्थिती असताना पनवेल, उरण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात भाजपतील पक्षप्रवेश, बूथ कार्यकर्ता संमेलने, विधानसभा मेळावे यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. विविध विकासकामांचा पाऊस पडत आहे. भाजपत येणार्‍यांचा ओघ वाढत आहे. रविवारी भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा पनवेलमध्ये आले होते. या वेळी ठाणे व कोकण विभागातील कार्यकर्त्यांचे एक भव्य संमेलन झाले. शासकीय व पक्ष पातळीवरील कार्यक्रमांमुळे भाजपत चैतन्याची लाट उसळल्याचे चित्र आहे.

निवडणूक म्हणजे भारतीय लोकशाहीचा उत्सव. लोकसभा निवडणुकीचा उत्सव नुकताच संपला. अनपेक्षितपणे भाजपने मोठे यश मिळविले. जीएसटी, नोटबंदी, सर्जिकल स्ट्राइक असे निर्णय सरकारने घेतले व त्याला जनतेने प्रतिसाद दिला. दुसर्‍यांदा सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारने तिहेरी तलाक कायदा, कलम 370 असे मोठे निर्णय घेतले. त्यामुळे जनता सरकारच्या कामावर खूश आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेस मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच महाराष्ट्र दौरा झाला. मुंबई, औरंगाबाद येथे मेट्रोसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधानांनी केले. मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे दौरे मुंबई, नवी मुंबई येथे सातत्याने होत आहेत. रायगड भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचा विचार घेऊन पक्ष संघटन मजबूत करीत आहेत. पनवेलमध्ये सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पेणमध्ये रविशेठ पाटील, उरणमध्ये महेश बालदी व अन्य तालुक्यांत पक्षाचे नेते मोठ्या प्रमाणात विकासकामे करीत आहेत. शासनाच्या योजना स्थानिक भाजपचे नेते, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सामान्य माणसांपर्यंत पोहचविल्या जात आहेत. विकासकामांचा पाऊस, पक्षाची वाढती ताकद यामुळे भाजपत येणार्‍यांची संख्या वाढतच आहे. अलिबाग, पनवेल, पेण, उरण भागांत शेकापसह अन्य पक्षांतील मंडळी भाजपत येत आहेत. जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व मोदी-फडणवीस यांच्या विचारांनी भाजपचा झेंडा हाती घेत आहेत. जिल्ह्यात भाजपची यशस्वी घोडदौड सुरू आहे. पक्षाच्या सदस्य नोंदणीलाही मोठा प्रतिसाद मिळाला. ‘मिस्ड कॉल द्या आणि भाजपत सहभागी व्हा’ ही चळवळ झाली. पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सदस्य नोंदणी मोहीम यशस्वी केली. पनवेल, उरण विधानसभा मतदारसंघांत बूथ कार्यकर्ता संमेलने झाली. या वेळी कार्यकर्त्यांत प्रचंड ऊर्जा व उत्साह दिसून आला. बूथ संमेलनात शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते भाजपत आले. अन्य पक्षांत मरगळ असताना भाजपत चैतन्य दिसत आहे. शासनाच्या तसेच पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विकासकामांचा धूमधडाका सुरूच आहे. ठाणे, कोकण विभाग कार्यकर्ता संमेलनानिमित्त भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा रविवारी पनवेलमध्ये होते. मेळाव्याच्या नियोजनाची जबाबदारी अत्यंत विश्वासाने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांनी सहकार्‍यांच्या मदतीने ती यशस्वीरीत्या पार पाडली. थेट राष्ट्रीय कार्याध्यक्षांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये मेळावा झाला. नड्डांचे मार्गदर्शन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे व मार्गदर्शक ठरणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply