सहशिक्षक न नेमल्यास विद्यालयाला रामराम; पालकांचा इशारा
खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील महड प्राथमिक शाळेत सहा वर्षापासून पहिली ते चौथीच्या वर्गावर एकच शिक्षक असल्यामुळे पाल्यांच्या भवितव्याबद्दल चिंताग्रस्त पालकांनी खालापूर गटशिक्षण अधिकारी यांची भेट घेत एका आठवड्यात दुसर्या शिक्षकाची नेमणूक करा अन्यथा पाल्यांचे दाखले द्या, अशी मागणी केली आहे.
खालापूर तालुक्यात महड येथे राजिप मराठी शाळेचे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. याठिकाणी दोन शिक्षकांची नेमणूक आहे. सहा वर्षापूर्वी या शाळेतील शिक्षकाला विद्यार्थींनीच्या विनयभंग प्रकरणी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आजतागायत दुसरा शिक्षक याठिकाणी कायमस्वरूपी नियुक्त करण्यात आलेला नाही. चार वर्ग सांभाळण्याची कसरत सध्या याठिकाणी असलेल्या शिक्षिकेला करावी लागत असून, चारही वर्गाचे विद्यार्थी एकाच वर्गात बसवून शिकवावे लागत आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याची तक्रार पालक करीत आहेत. तात्पुरती सहशिक्षिका याठिकाणी नेमण्यात आली होती, तीचीसुद्धा बदली करण्यात आली आहे. त्यामुळे येथे एकशिक्षकी शाळा सुरू असून कित्येक पालकांनी आपल्या मुलाचे नाव या शाळेतून कमी करून खोपोली येथील शाळेत प्रवेश घेतला आहे. याचा परिणाम पटसंख्येवर जाणवत असून, पाच वर्षापूर्वी साठच्या घरात असलेला पट तीसच्या खाली आला आहे.
सोमवारी (24जून) महडमधील जागरूक पालकांनी खालापूर पंचायत समिती कार्यालय गाठत प्रभारी गटशिक्षण अधिकारी पोळ यांची भेट घेतली. आठवडाभरात दुसर्या शिक्षकांची नेमणूक करा अन्यथा आमच्या मुलांचे दाखले द्या, असा इशारा दिल्याचे पालक ज्योती राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
जून महिन्याच्या अखेरीस नवीन शैक्षणिक वर्षात अतिरिक्त शिक्षक कुठे आहेत, याची माहिती मिळेल. त्यानंतर महड शाळेसाठी दुसर्या शिक्षकाची नेमणूक आठवडा भरात होईल.
-भाऊसाहेब पोळ, प्रभारी गटशिक्षण अधिकारी, खालापूर