Breaking News

कामोठेतील दुहेरी हत्याकांडातल्या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा

पनवेल ः वार्ताहर

मागच्या सोमवारी कामोठेत घडलेल्या दुहेरी  हत्याकांडातील आरोपी सुरेश चव्हाण याने आपल्या लहान भावाच्या पत्नीची गळा आवळून हत्त्या केल्यानंतर तिच्यावर त्याने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक बाब तपासात उघडकीस आली आहे. त्यामुळे कामोठे पोलिसांनी आरोपी सुरेश चव्हाण याच्यावर हत्येसह बलात्काराचा देखील गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी सुरेश चव्हाण हा 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे.

संशयित आरोपी सुरेश चव्हाण हा कामोठे सेक्टर-34मध्ये आई-वडील, लहान भाऊ योगेश, त्याची पत्नी, व दोन वर्षीय पुतण्या अविनाश यांच्यासह राहत होता. सुरेश हा मागील 8-9 वर्षापासून काहीच कामधंदा करत नव्हता. त्याला घराबाहेर काढले गेले होते. दोन वर्षापूर्वी सुरेशला आई-वडिलांनी माफ करुन त्याला पुन्हा घरामध्ये रहाण्यास घेतले होते. त्यावेळी सुरेश कधी सुधरणार नाही, त्यामुळे त्याला घरामध्ये घेऊ नये, यासाठी योगेशने आपल्या आई-वडिलांची समजूतदेखील काढली होती. परंतु आई-वडिलांनी त्याचे न ऐकता सुरेशला घरामध्ये घेतले होते.

 पंधरा दिवसापूर्वी सुरेशचे आई-वडील गणपतीनिमित्त गावी गेल्याने घरात लहान भाऊ योगेश त्याची पत्नी व त्यांचा मुलगा अविनाश व सुरेश हे चौघेच होते. सोमवारी दुपारी लहान भाऊ योगेश हा कामावर गेल्यानंतर सुरेशने त्याला घराबाहेर काढल्याच्या रागातून योगेशच्या पत्नीसोबत वाद घालून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र योगेशच्या पत्नीने त्याला विरोध केल्याने सुरेशने रागाच्या भरात तिची व पुतण्या अविनाश या दोघांची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो घरातच बसून राहिला होता. दुसर्‍या दिवशी ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास योगेश कामावरुन घरी परतल्यानंतर घरात पत्नी व मुलगा हे दोघे मृतावस्थेत पडल्याचे त्याच्या निदर्शनास आले होते.

याबाबत कामोठे पोलिसांनी सुरेशवर हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. मात्र पोलिसांनी या हत्या प्रकरणात सुरेशची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने योगेशच्या पत्नीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्याने योगेशच्या पत्नीची हत्या केल्यानंतर तिच्यासोबत त्याने अतिप्रसंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply