Breaking News

सौरभ वर्माची विजेतेपदाची हॅट्ट्रिक

हनोई : वृत्तसंस्था

भारताचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने व्हिएतनाम खुल्या बीडब्लूएफ टूर सुपर 100 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. सौरभचे हे या वर्षातील तिसरे विजेतेपद ठरले. त्याने यंदा हैदराबाद आणि स्लोव्हेनिअन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.

सौरभने चीनच्या सन फेई झियांगवर संघर्षपूर्ण विजय मिळवला. दुसर्‍या मानांकित सौरभने 1 तास आणि 12 मिनिटे रंगलेल्या अंतिम सामन्यात झियांगला 21-12, 17-21, 21-14 असे तीन गेममध्ये पराभूत केले.

जागतिक क्रमवारीत 44व्या स्थानी असलेल्या सौरभने अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. पहिल्या गेममध्ये त्याने 11-4 अशी आघाडी घेतली. त्याने झियांगला फारशी संधी न देता पहिला गेम 21-12 असा सहज जिंकला. दुसर्‍या गेममध्ये मात्र झियांगने जोरदार पुनरागमन केले. 8-0 अशी आघाडी घेऊन त्याने सौरभवर दडपण आणले. सौरभने 11-14 अशी पिछाडी कमी केल्यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली, परंतु झियांगने संधी न गमावता सौरभला दुसर्‍या गेममध्ये 21-17 असे नमवून 1-1 अशी बरोबरी साधली.

निर्णायक तिसर्‍या गेममध्ये पुन्हा एकदा दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. मध्यंतराला सौरभने 11-7 अशी आघाडी मिळवण्यात यश मिळवले, मात्र त्यानंतर झियांगने सर्वस्व पणाला लावून गुणांचे अंतर 14-17 असे कमी केले, परंतु 26 वर्षीय सौरभने सलग चार गुण मिळवून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply