Breaking News

कोण पटकावणार बहुमानाचा अटल करंडक? रविवारी पारितोषिक वितरण

ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने होणार सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त
एकाहून एक अशा सरस अशा एकांकिका सादर होत असल्याने यंदाचा बहुमानाचा अटल करंडक कोण पटकावणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. निमित्त आहे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुरू असलेल्या 11व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे.
शुक्रवारपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत राज्यातून निवड झालेल्या 25 एकांकिकांचे सादरीकरण होत आहेत. या एकांकिकांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. उत्कृष्ट आयोजन व नियोजन, भरघोस रकमेचे पारितोषिके, ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन आणि संधी यांचा मिलाप असलेल्या या स्पर्धेतून आजवर अनेक कलाकार घडले आहेत. नाट्य चळवळ वद्धींगत व्हावी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वद्धींगत व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे स्पर्धा राज्यात नावाजली असून उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या स्पर्धकांना यंदाही भरघोस रकमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि., तर सहप्रायोजक नील ग्रुप आणि स्थळ प्रायोजक पनवेल महापालिका आहे.
या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 12) सायंकाळी 7 वाजता स्पर्धास्थळ ठिकाणी अर्थात आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या सोहळ्यात ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची सन्माननीय; तर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने, सुप्रसिद्ध दिग्दर्शक देवेंद्र पेम, विराजस कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेता जयवंत वाडकर, सुप्रसिद्ध नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, अटल करंडक ब्रँड अँम्बेसिडर सुप्रसिद्ध अभिनेत्री रूचिरा जाधव, सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले यांची उपस्थिती असणार आहे.
या महाअंतिम फेरीच्या अनुषंगाने नाट्य एकांकिकांचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील आणि टीम अटल करंडक यांनी केले आहे. अंतिम फेरीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून उर्वरित एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा होईल.

Check Also

सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …

Leave a Reply