Breaking News

‘कहो ना… प्यार है’ला पंचवीस वर्ष झालीदेखील!

अगदी कालपरवाची गोष्ट वाटते. मनोरंजन उपग्रह वाहिन्यांवर अवघ्या काही सेकंदाच्या एका तजेलदार नवीन टीझरने आपलं लक्ष वेधून घेतले होते. ते नवीन चेहरे होते हृतिक रोशन व अमिषा पटेल, तर चित्रपट ’कहो ना… प्यार है’. एका छोट्याशा म्युझिक पिसवरचा न्यूझीलंडच्या प्रसन्न समुद्र किनार्‍यावरील या दोघांचे नवीन शैलीतील नृत्य… नवीन शतकातील प्रवेश करणारी युवा पिढी तर झालीच, पण मागील दशकातील म्हणजे ऐंशी नव्वदच्या दशकातीलही युवा पिढी या टीझरने भारी इम्प्रेस झाली.
कहो ना प्यार हैच्या आगमनाबाबत अतिशय तरुण आल्हाददायक वातावरण निर्माण झाले, तरी या चित्रपटाची आणि त्यातही हृतिक रोशनची क्रेझ निर्माण होईल असे कोणाला हो वाटले होते? राकेश रोशनचा चित्रपट दिग्दर्शनातील ग्राफ चढउताराचा असला तरी त्याने तरी या चित्रपटाच्या घवघवीत यशाची अपेक्षा कुठे हो ठेवली होती?
आणि आज पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावरही हा चित्रपट तितकाच फ्रेश आहे. त्यातील हृतिक रोशनची नवीन स्टाईलमधील नृत्य शैली आणि राजेश रोशनचे तरुण संगीत हेही तितकेच आज तारुण्यात आहे.
कहो ना… मुंबईत रिलीज 14 जानेवारी 2000. मेन थिएटर इरॉस. फर्स्ट शोपासूनच पिक्चर युवा रसिकांना आवडला आणि तरुणांना आवडलेले चित्रपट कायमच हाऊसफुल्ल गर्दीत एन्जॉय केले जातात हे तर अनेक वर्षाचे हुकमी समीकरण.
आजही हा चित्रपट ’जुना’ अथवा मागील पिढीतील, इतकेच नव्हे तर सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या काळातील म्हणूनही गणला जात नाही. (तोपर्यंत मल्टीप्लेक्स युगाला गती आली नव्हती.)
हा चित्रपट पडद्यावर आला रे आला आणि सगळं वातावरणच बदलून गेले. जणू वातावरण तारुण्याने चार्ज झाले. कहो ना… प्रदर्शित होईपर्यंत ’आल्सो चित्रपट’ असं म्हटलं जाई. म्हणूनच म्हणतो, पिक्चर रिलीज झाल्यावरच तो हिट की फ्लॉप हे समजते नि तो हक्क तिकीट काढून येणार्‍या पब्लिकचा! सर्व हक्क प्रेक्षकांच्या स्वाधीन.
मला आठवतंय, या चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी सुरू होताच अनेक पत्रकारांनी निर्माता व दिग्दर्शक राकेश रोशनच्या मुलाखतीला पसंती दिली. तोपर्यंत मी ’खुदगर्ज’ व ’करण अर्जुन’ या चित्रपटांच्या निमित्ताने राकेश रोशनची दोनदा सविस्तर व एक्स्युझिव्हज मुलाखत केल्याने मी हृतिक रोशनच्या मुलाखतीला पसंती दिली. नवीन पिढीसोबत जोडून राहायला हवे हा मंत्र चित्रपटाचे जगही देतो. राकेश रोशनच्या फिल्म क्राफ्ट या निर्मिती संस्थेचे ऑफिस तेव्हा सांताक्रूझ पश्चिमेला होते, तेथून निरोप आला. जुहू येथील अमिताभ बच्चनच्या प्रतिक्षा बंगल्याच्या मागच्या रस्त्यावरील कविता बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावर राकेश रोशनचे घर आहे, तेथे हृतिक रोशनची भेट घेता येईल. त्यानुसार मी गेलो. एक लक्षात घ्या, तोपर्यंत हृतिक रोशन या नावाला अजिबात ओळख नव्हती. ग्लॅमर नव्हते. राकेश रोशनचा मुलगा अशी व इतकीच त्याची ओळख होती आणि ती जपूनच सवडीनुसार तो दररोज एक मुलाखत देत होता. तशा पद्धतीनुसार मुलाखत घेणे नि देणे यांचे ते छान दिवस होते. आठवणीत राहिलेत. त्या घरात राकेश रोशनने एके काळी भूमिका केलेल्या ’घर घर की कहानी’, ’पराया धन’, ’खेल खेल मे’, ’झूठा कहीं का’ ’हत्यारा’ अशा चित्रपटांच्या यशाच्या स्मरणचिन्ह (अर्थात ट्रॉफिज) पाहून मी हृतिक रोशनला प्रश्न केला, हे चित्रपट तू पाहिले आहेस का? तो छान हसला आणि नाही म्हणाला, पण माझं हिंदी ऐकून मी महाराष्ट्रीय आहे हे लक्षात येताच तो म्हणाला, शाळेत असताना मला पन्नास गुणांचे मराठी होते. त्याचा हा प्रांजळपणा मला आवडला. (डिजिटल मीडियात हीच जणू बातमी). मला आठवतंय, त्या घरातील दूरसंचवाणीवर भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी क्रिकेट सामना सुरू होता. थोडा वेळ तो आम्ही एन्जॉय केल्यावर मग आमची मुलाखत रंगली. तोपर्यंत तो ’चित्रपटात आलेला नवीन चेहरा’ होता, त्यामुळेच त्याच्या वागण्या/बोलण्यात/ पाहण्यात/ ऐकण्यात एक प्रकारचे साधेपण होते.
या चित्रपटाच्या अंधेरीतील एक पंचतारांकित स्थळी गाण्याच्या ध्वनिफित प्रकाशन सोहळ्यातही हृतिक रोशनचं एकूणच वागणं/वावरणं हे अगदीच सर्वसाधारण असेच होते. इतकेच की त्याची मैत्रीण सुझान खान आपले पिता संजय खान व आईसोबत आली होती. राकेश रोशन मात्र अतिशय रूबाबात वावरत होता आणि अगदी अपेक्षेप्रमाणेच त्याचे मित्र जितेंद्र व ऋषि कपूर यांच्या हस्ते ऑडिओ रिलीज झाले. विशेष उल्लेखनीय गोष्ट जया बच्चन या इव्हेन्टसला हजर होत्या. ते दिवसच वेगळे होते. अशा सोहळ्याच्या आठवणी मनात जागा मिळवत. चित्रपटसृष्टीत प्रत्यक्षात भटकंती/निरीक्षणे करण्यातून हे आले. मनात राहिले.
मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांसाठी गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीतील मिनी थिएटरमध्ये झाला. छान मनोरंजक चित्रपट अशीच आमची सर्वसाधारण प्रतिक्रिया होती आणि असे ढिगभर पिक्चर पाहिल्याने त्यात आणखीन एक भर असाच एकूण मामला होता.
पिक्चरची गाणी हा कायमच महत्त्वाचा सेट. आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील जान. मराठी व हिंदीसह तब्बल पस्तीस भाषेत चित्रपट निर्माण होताहेत त्यातील गीत संगीत व नृत्य संस्कृती बहुस्तरीय. कहो ना…ची गाणी अतिशय वेगाने लोकप्रिय झाली. युवा पिढीला कॅची वाटली. ही एम टीव्ही पिढी होती. अजून हातोहाती मोबाईल आला नव्हता, पण तरुण संगीत हवं होते. त्यातच नृत्य दिग्दर्शिका फराह खानने हृतिक रोशनला दिलेल्या नृत्य स्टेप्स भन्नाट व स्टाईलीश. कहो ना… प्यार है, ना तुम जानो ना हम, प्यार की कश्ती मे, चांद सितारे, दिल ने दिल को पुकारा, एक पल का जीना… तरुणाईवर या प्रत्येक गाण्याची विलक्षण जादू. गाण्यांसाठी पुन्हा पुन्हा हा चित्रपट पाहू जाऊ लागला. गाण्यांसाठी आपल्या देशातील चित्रपट रसिकांनी अनेक चित्रपट पुन्हा पुन्हा एन्जॉय केलेत. चित्रपटात ह्रतिक रोशनची रोहित व राज चोप्रा अशी दुहेरी भूमिका. एकसारखेच दिसणारे दोघे आणि प्रेमकथा व सूडाची गोष्ट याभोवतीची हनी इराणीची पटकथा. चित्रपटातील राज आणि सोनिया सक्सेना (अमिषा पटेल) यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग हा हृतिक रोशन व सुझानच्या प्रत्यक्षातील पहिल्या भेटीसारखाच अशी ’स्टोरी’ रंगली. अशा गोष्टी चित्रपटाला फोकसमध्ये ठेवतात.
मध्यंतरनंतर न्यूझीलंडच्या अतिशय अप्रतिम अशा दिलखुलास मोकळ्याढाकळ्या निसर्ग सौंदर्यात. (न्यूझीलंडला शूटिंगला जा हा सल्ला गीतकार व दिग्दर्शक सावनकुमार यांचा. ’सनम हरजाई’चं त्यांनी तेथेच शूटिंग केले होते.) कहो ना…च्या देखणेपणात न्यूझीलंडचा वाटा खूपच महत्त्वाचा. अहो, पिक्चर हिट होताच चक्क न्यूझीलंडचे पर्यटन वेगाने वाढले. चित्रपटाचे यश बरेच काही घडवत असतेच असते. काही महिन्यांनी याची परतफेड करण्यासाठी की काय न्यूझीलंडचे विदेश मंत्री भारत भेटीवर आले आणि दक्षिण मुंबईतील एका शानदार हॉटेलमध्ये शानदार खाना आयोजित केला होता. मला आठवतंय त्यात राकेश रोशनला किती बोलू नि किती नको असे झाले होते. चित्रपटाच्या जगात यश हेच चलनी नाणे असल्यानेच अशा अनेक लहान मोठ्या
गोष्टी घडत असतात.
पिक्चर सुपरहिट झाला आणि अनेकांना करिना कपूरची आठवण आली. यामागे एक ’स्टोरी’ आहे. चित्रपट सरळ रेषेत बनतीलच याची खात्री नसते.
’कहो ना…प्यार है’मध्ये तीच हृतिक रोशनची नायिका होती. मुंबईत महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओतील पहिल्या चित्रीकरण सत्रात तिने भागही घेतला. त्या शूटिंगच्या बातम्या आल्या. त्यात हृतिक रोशनपेक्षा करिनाचे अर्थात बेबोचे पारडे जड वाटत होते. काही झाले तरी ती कपूर. तीच ’रोशन’ असणार.
अभिषेक बच्चन अभिनय क्षेत्रात आला आणि कहानी मे ट्विस्ट आला. अमिताभ बच्चनचा मुलगा म्हणजे अतिशय वजनदार गोष्ट. करिना अर्थात बेबोच्या अतिशय महत्त्वाकांक्षी आई बबिताला वाटलं, ह्य… हृतिक रोशन काय? त्यापेक्षा अभिषेक बच्चन मोठ्ठ नाणे. सोनेरी संधी. त्याच्यासोबत करिनाचा पहिला चित्रपट असावा. तिने तशी राकेश रोशनला कल्पना देत ’कहो ना…’मधून करिनाला बाहेर काढून जे.पी. दत्ता दिग्दर्शित ’रिफ्यूजी’मध्ये करिनाला अभिषेक बच्चनची नायिका केले. स्टार मांचा फिल्मी हट्ट दुसरं काय? आणि अमिषा पटेलला ’कहो ना…’ची जणू लॉटरी लागली. चित्रपटाच्या जगातील पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंगतदार असतात. त्यालाही चित्रपटाच्या प्रवाहात स्थान आहे हो.
हृतिक रोशनने बालकलाकार म्हणून आपले आजोबा जे. ओम प्रकाश यांच्या दिग्दर्शनातील आशा, आसपास, भगवानदादा या चित्रपटात भूमिका साकारल्याने ’चित्रपट कॅमेरा’ साधारण माहित होता. वयात येताना आपले दिग्दर्शक पिता राकेश रोशनच्या करण अर्जुन, कोयला, कारोबारच्या वेळेस सहाय्यक दिग्दर्शक म्हणून उमेदवारी करताना चित्रपटाच्या सेटवरचे वातावरण आणि हे माध्यम याच्याशी त्याचा परिचय वाढला. राकेश रोशनचा मुलगा म्हणून त्याला स्पेशल ट्रीटमेंट अजिबात नव्हती. चित्रपटसृष्टीत येताना अशा लहान मोठ्या गोष्टी फारच उपयुक्त असतात याचा धडा या क्षेत्रात येणार्‍यांसाठी खूप महत्त्वाचा. हृतिक रोशनमधील नवीन गोष्टी शिकण्याची प्रवृत्ती त्यालाच हितकारक ठरली. त्याचं फिजिक्स (दणकट शरीरयष्टी), वेगळीच नृत्य शैली या गोष्टीवरचे त्याचे लक्ष आणि त्यावरची त्याची मेहनत उल्लेखनीय. स्टार एका दिवसात घडत नसतो. त्यामागे असा एक प्रवास असतो. कहो ना…च्या यशाच्या मंतरलेल्या वातावरणातील त्याच्या अफाट क्रेझने शाहरूख, आमिर, सलमान या खानावळीलाही मागे सारले. त्यांचा एक उत्तम स्पर्धक निर्माण झाला.
…हे सगळं कलरफुल घडून चक्क पंचवीस वर्ष झालीदेखील? म्हणजे रसिकांच्या दोन पिढ्या ओलांडूनही हा चित्रपट सतेज, तारुण्यात, त्याचं आकर्षण कायम आहे. आजही यातील एक पल का जीना… गाण्यावर क्लब, पब, पार्टीत आजची तरुणाई नाचायला लागते, तेव्हा चित्रपटाचे नाव सार्थ होते कहो ना…प्यार है!

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply