पाली : प्रतिनिधी
अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त पाली (ता. सुधागड) येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि.17) मुसळधार पावसातही भाविकांनी गर्दी केली होती. येथील दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांचा धंदादेखील तेजीत होता.
रायगडसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक व पर्यटक मंगळवारी मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. काही तरुण, महिला पायी चालत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आल्या होत्या.
भरपावसातही भक्तांच्या उत्साहाला आणि भक्तीला उधाण आले होते. मंदिरदेखील हार, फुले आणि विद्युत रोषणाईने सजले होते.
पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पाली पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षारक्षक वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.