खोपोली : प्रतिनिधी
शहरात मागील आठवड्यात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले होते. त्या सर्वांच्या रक्ताचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत पाठवून तपासणी केली असता त्यांना डेंग्यूची लागण झाली नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी त्यांनी नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही केले. लक्ष्मण गायकवाड (60), रमेश मोरे (34), हरिभाऊ जगताप, सुनील मसाते, अर्चना सिन्हा आणि अभिमन्यू चंदनशिवे हे डेंग्यूचे संशयित रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल होते. त्यानंतर त्यांचे रक्ताचे नमुने मुंबई येथील ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. समूह रुग्णालय येथे पाठविण्यात आले. त्याचे अहवाल प्राप्त झाले असून, त्या सर्वांना डेंग्यूची लागण झाली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तरीही नागरिकांनी सतर्क राहून आपल्या परिसरात स्वच्छता ठेवावी. पाणी झाकून ठेवावे. पाणी उकळून, गाळून प्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी केले आहे.