हैदराबाद : वृत्तसंस्था
ट्वेटी-20 मालिकेतील पराभव विसरून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. या मालिकेतून वर्ल्ड कप साठीचा भारतीय संघ निडवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील असणार आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीगमधील कामगिरीवरून वर्ल्ड कप संघात बदल केले जाणार नाही, असे स्पष्ट मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केलं.
कोहली म्हणाला, या मालिकेतून वर्ल्ड कप स्पर्धेचा संघ निवडण्यात येईल. वर्ल्ड कप संघ निवडताना वेगळ्या गणितांचा विचार केला जातो आणि आम्हाला मजबूत संघ हवा आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच आम्हाला वर्ल्ड कप संघ निश्चित करायचा आहे. त्यामुळे आयपीएलमधील कामगिरीनंतर या संघात बदल होईल, असे मला वाटत नाही. एक-दोन खेळाडूंना आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, म्हणून त्यांना संघातून वगळले जाईल असे नाही.
लोकेश राहुलचे कमबॅक ही संघासाठी सकारात्मक बाब आहे. त्याला सातत्य राखण्याची आवश्यकता आहे. वर्ल्ड कप संघासाठी तो चांगला पर्याय ठरू शकतो, परंतु त्याला कामगिरी उंचवावी लागेल, असे कोहलीने स्पष्ट केले.