अलिबाग : प्रतिनिधी
दिवेआगर येथील मंदिरात नव्याने तयार करण्यात आलेल्या गणपतीच्या सुवर्ण मुखवट्याची प्रतिष्ठापना अंगारक चतुर्थीचे औचित्य साधून मंगळवारी (दि. 23) केली जाणार आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील मंदिरातून 23 मार्च 2012 रोजी दरोडेखोरांनी दोन सुरक्षा रक्षकांचा खून करून सुवर्णगणेशाचा मुखवटा व दागिने मिळून एक किलो 600 ग्रॅम सोने पळवून नेले होते. पोलिसांनी तपास करून दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्याकडून वितळलेल्या मुखवट्याचे एक किलो 351 ग्रॅम सोने लगडीच्या स्वरूपात हस्तगत केले होते. हे सोने परत मिळावे यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यावरील सुनावणीअंती हे सोने पुन्हा राज्य सरकारला द्यावे, असे निर्देश मार्चअखेरीस न्यायालयाने दिले होते. न्यायालयीन आदेशानुसार मुद्देमालापासून सुवर्णगणेशाच्या आधीच्या मुखवट्याप्रमाणेच नवीन मुखवटा तयार करून त्याची प्रतिष्ठापना करण्याचे निर्देश संबंधितांना दिले होते. त्यानुसार नव्याने मुखवटा तयार करून घेण्यात आला. अंगारक चतुर्थीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नवीन गणेश मुखवट्याची गणेश मंदिरात पुनर्स्थापना केली जाणार आहे.