पनवेल ः वार्ताहर – यंदाच्या 26 व्या वर्षी श्री अमरनाथ सेवा मंडळ, पनवेलने आपली वैभवशाली परंपरा कायम राखत शुक्रवारी (दि. 28) पनवेल शहरातील विरुपाक्ष महादेव मंदिराचे आशीर्वाद घेऊन त्याची यथासांग महापूजा करून अमरनाथ यात्रेकडे प्रस्थान केले.
गेल्या 25 वर्षांची या सेवा मंडळाची परंपरा असून ते दरवर्षी पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जुलै रोजी बाबा बर्फानीचे दर्शन घेतात. यंदाचा पहिला जथ्था किशोर महाले व संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली 29 रोजी विमानाने श्रीनगरमार्गे बायटल येथे मुक्काम करून बमबम भोले व महादेवच्या गजरात यात्रेचा प्रारंभ 1 जुलै रोजी बाबा बर्फानीच्या दर्शनास जाणार आहेत, तर मंडळाचा दुसरा जथ्था सुनील कुरघोडे यांच्या नेतृत्वाखाली 5 जुलै रोजी निघणार असून 8 जुलै रोजी दर्शन घेणार आहेत. आज पारंपरिक प्रथेनुसार सर्व यात्रेकरूंनी श्री विरुपाक्ष महादेव महाराजांचे दर्शन घेऊन यात्रा यशस्वी करण्याचे साकडे घातले. यावेळी विरुपाक्ष महादेव मंदिराचे विश्वस्त गुरुनाथ तथा संदीप लोंढे व महेंद्र गोडबोले यांनी यात्रेकरूंचे मंदिरात स्वागत करून महादेवास यात्रा यशस्वी करण्याचे साकडे यात्रेंकरूंसह घातले. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनील आचोळकर यांच्यासह इतर यात्रेकरू व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.