पुणे : प्रतिनिधी
अभिषेक सिंग आणि अर्जुन देशवालच्या आक्रमक चढायांना सुरिंदरसिंग आणि फझल अत्राचलीच्या पकडींची साथ मिळाल्याने यू मुम्बा संघाने प्रो-कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धा संघावर 39-36 अशी मात केली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे.
पूर्वार्धात यूपी योद्धाच्या रिशांक देवाडिगा, श्रीकांत जाधव, सुरेंदर गिल यांनी आपला करिष्मा दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे यूपीने मुम्बावर लोण चढवून 11-2 अशी आघाडी मिळवली. यानंतर मुम्बाच्या अभिषेक आणि अर्जुनने जोरदार चढाया केल्या. पकडीतही त्यांनी यूपीच्या चढाईपटूंना रोखले. त्यामुळे मुम्बाला यूपी संघावर लोण चढविण्यात यश आले. मध्यंतराला यूपी योद्धा संघाकडे 16-15 अशी एका गुणाची किमान आघाडी होती. मुम्बाकडून अभिषेक सिंगने (11) सुपर-10 कामगिरी केली, तर अर्जुनने सात गुण घेत त्याला चांगली साथ दिली. सुरिंदरने सहा, तर फझलने तीन गुण मिळवले. यूपी योद्धाकडून रिशांकने 9, श्रीकांतने 8, तर सुरेंदरने 4 गुण मिळवले. या विजयासह मुम्बा 48 गुणांसह पाचव्या स्थानी राहिला. एवढ्याच गुणांसह यूपी संघ सहाव्या स्थानावर आहे.