अॅडलेड ः वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अॅडलेड ओव्हलवर खेळला जात आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित केला. यजमानांकडून मार्नस लाबुशेनने शतक ठोकत 103 धावा केल्या. यासह गुलाबी चेंडू कसोटीत तीन शतके झळकावणारा लाबुशेन पहिला फलंदाज ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला मार्कस हॅरिसच्या (3) रूपात लवकर मोठा धक्का बसला. येथून डेव्हिड वॉर्नरने मार्नस लाबुशेनसोबत दुसर्या विकेटसाठी 172 धावांची भागीदारी करून संघाला आधार दिला. वॉर्नर सलग दुसर्या डावात नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला. वॉर्नरने 11 चौकारांच्या मदतीने 95 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर लाबुशेनने कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबत अर्धशतकी भागीदारी केली. स्टीव्ह स्मिथने ट्रॅव्हिस हेडसह चौथ्या विकेटसाठी 50 धावा केल्या. तब्बल तीन वर्षांनी ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद भूषवत स्मिथने 93 धावा केल्या. त्याच्याशिवाय अॅलेक्स कॅरीने 52, तर मिचेल स्टार्कने 39 धावा केल्या. 294 धावांवर 5 विकेट गमावल्यानंतर स्मिथने अॅलेक्स कॅरीसह 91 धावा जोडल्या. यानंतर पदार्पण करणार्या मायकेल नेसरने मिचेल स्टार्कसह आठव्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी करीत संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. नेसरने पहिल्या कसोटी डावात 35 धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने तीन, तर जेम्स अँडरसनने दोन बळी घेतले.