चँगझ्होयू (चीन) : वृत्तसंस्था
भारताच्या सायना नेहवालला चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला, तर वर्ल्ड चॅम्पियन पी. व्ही. सिंधूने अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली. महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफनने सायना नेहवालला 21-10, 21-17 असे सहज नमवले.
सिंधूने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या चीनच्या ली शूरुईवर 21-18, 21-12 अशी मात करून विजयी सलामी दिली. पुढील फेरीत सिंधूला सामना करायचा आहे तो थायलंडच्या पोर्नोपावी चोचूवांगचा. जागतिक स्पर्धेत ब्रांझ पदकाची कमाई करणार्या बी. साईप्रणीतने पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली. 27 वर्षांच्या साईप्रणीतने थायलंडच्या सुपान्यू अविहिंगसॅननची झुंज 21-19, 21-23, 21-14 अशी मोडून काढली. यानंतर पारुपल्ली कश्यपने फ्रान्सच्या ब्रिस लेव्हेरडेझवर 21-12, 21-15 अशी मात करून दुसरी फेरी गाठली. महिला दुहेरीतील अश्विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी जोडीनेही दुसरी फेरी गाठली. सलामीच्या लढतीत तैपईच्या चेंग-ली यांनी 13-21, 8-11 अशा पिछाडीनंतर माघार घेतली. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा-सिक्की रेड्डी यांनी गेम पॉइंट वाया घालवत पराभव ओढवून घेतला.