Breaking News

उरणमध्ये कोण मारणार बाजी?

उरण : प्रतिनिधी/वार्ताहर

उरण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी जासई येथे मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या सिडकोच्या इमारतीमध्ये गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजता सुरू होणार असून, निकाल दुपारी 3 वाजेपर्यंत जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे उरणचा शिलेदार कोण असणार हे उद्या दुपारी जाहीर होणार असल्याने उमेदवारांसह मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मतमोजणीच्या ठिकाणी बंदिस्त मंडप, टेबल, खुर्च्या, मॅट सरंक्षक जाळीसह व्यवस्था करण्यात आली आहे. उरण मतदारसंघात एकूण दोन लाख 18 हजार 611 मतदान झाले असून, प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी प्रत्येक टेबलावर असणार आहे. असे 14 टेबल असून, टपाल मतांच्या मोजणीसाठी 1 टेबल अशी एकूण 15 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी सुद्धा प्रत्येक उमेदवारांचा प्रतिनिधी असणार आहे. प्रत्येक फेरीस सर्व टेबलावर मतमोजणी सुरू राहणार आहे. प्रत्येक टेबलनिहाय एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक व एक शिपाई असे कर्मचारी असणार आहेत.

सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल. दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व फेर्‍यांची मतमोजणी पूर्ण होऊन अधिकृत निकाल घोषित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मतमोजणी दरम्यानच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. याकरिता कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उरण विधानसभेसाठी 74.32 टक्के मतदान झाले आहे. उरणमध्ये एकूण दोन लाख 94 हजार 151 मतदार असून त्यापैकी दोन लाख 18 हजार 611 मतदारांनी मतदान केले आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार मनोहरशेठ भोईर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शेकापचे विवेक पाटील व भाजपचे बंडखोर महेश बालदी अशी अत्यंत चुरशीची तिरंगी लढत झाल्याने निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply