Breaking News

चौथ्यांदा गाठले जेतेपदाचे ‘लक्ष्य’

इमिरात अरेना : वृत्तसंस्था

भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने स्कॉटिश खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळवताना पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत ब्राझीलच्या इगर कोएल्होचा पराभव केला. लक्ष्यचे हे तीन महिन्यांत हंगामातील चौथे विजेतेपद ठरले.

लक्ष्यने इगरचा 56 मिनिटांत 18-21, 21-18, 21-19 असा पराभव केला. उत्तराखंडच्या 18 वर्षीय लक्ष्यने सप्टेंबरपासून सॉरलॉरलक्स खुली, डच खुली व बेल्जियम आंतरराष्ट्रीय अशा तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. या विजयासह लक्ष्य जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या क्रमवारीतील अव्वल 40 खेळाडूंमध्ये मजल मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे अव्वल स्तरावरील दोन स्पर्धांमध्ये त्याला थेट प्रवेश मिळवण्याची शक्यता आहे.

आयरिश खुल्या स्पर्धेच्या दुसर्‍याच फेरीत गारद झालेल्या लक्ष्यने स्कॉटिश स्पर्धेत दिमाखदार कामगिरीचे प्रदर्शन करीत जेतेपदावर नाव कोरले. ऑस्ट्रियाच्या लुका व्रॅबरविरुद्ध सरळ गेममध्ये विजय मिळवत जागतिक क्रमवारीत 41व्या स्थानावरील लक्ष्यने आपल्या विजयी अभियानाला प्रारंभ केला. मग त्याने कायरॅन जॉर्जला नामोहरम केले. उपांत्यपूर्व सामन्यात त्याने सहाव्या मानांकित ब्रायन यँगचा आणि उपांत्य सामन्यात फ्रान्सच्या ख्रिस्टो पोपोव्हचा पराभव केला.

अंतिम फेरीत पहिल्या गेममध्ये लक्ष्य सुरुवातीला पिछाडीवर पडला होता, परंतु नंतर त्याने जोरदार मजल मारत 10-8 अशी आघाडी घेतली. त्यानंतर इगरने सहा गुण घेत 14-10 अशी आघाडी मिळवत हा गेम जिंकला. दुसर्‍या गेममध्ये लक्ष्यने 7-0 अशी वर्चस्वपूर्ण आघाडी घेतली, परंतु इगरने 17-17 अशी बरोबरी साधली, पण लक्ष्यने हा गेम जिंकत बरोबरी साधली. तिसर्‍या निर्णायक गेमध्ये दोघांनीही आघाडीसाठी शर्थीचे प्रयत्न केले. इगरने 11-8पर्यंत आघाडी घेतली, मात्र त्यानंतर लक्ष्यने त्याला मागे टाकत गेमसह सामना जिंकला.

स्कॉटिश खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावल्याचा अत्यंत आनंद होत आहे. माझा मित्र इगरविरुद्धच्या लढतीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. डेन्मार्कमध्ये त्याच्यासोबत प्रशिक्षणाचाही मी उत्तम आनंद लुटला होता.

-लक्ष्य सेन

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply