
महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील मुमुर्शी आदिवासीवाडी येथील आदिवासींच्या झोपड्यांवर वीज पडल्याने 17 आदिवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एक वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. मंगळवारी (दि. 22) सायंकाळी आठ वाजता ही घटना घडली. जखमी सर्व आदिवासींवर तालुक्यातील विन्हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. महाड तालुक्यामध्ये गेले काही दिवस दररोज सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. मंगळवारी सायंकाळी विजा चमकत पावसाला सुरुवात झाली. या वेळी मुमुर्शी आदिवासीवाडी येथील वस्तीवर वीज पडली. त्यात वाडीतील झोपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर झोपड्यांमधील 17 जण जखमी झाले. घटनेचे वृत्त समजताच शाखाप्रमुख संजय पार्टे, तय्यब पोवेकर, पोलीस पाटील संजय सकपाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व याबाबतचे वृत्त प्रशासनालाही कळवले. जखमींना माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे, माजी सभापती सीताराम कदम, संजय दळवी व तलाठी पाटील यांच्या मदतीने विन्हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. सर्वांवर उपचार सुरू आहेत. जखमींना सलाईन लावण्यात आले आहे. सर्व आदिवासींची प्रकृती स्थिर आहे. तलाठी पाटील यांनी संबंधित घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
जखमींची नावे
हिरा निकम (वय 25), विलास पवार (वय 30), सीता जाधव (वय 32), रमेश जाधव (वय 17), दत्ताराम पवार (वय 32), चंद्रा पवार (वय 30), शांताराम काटकर (वय 55), भीमा काटकर (वय 45), मंदा पवार (वय 32), सनी पवार (वय 15), सुषमा जाधव (वय 28), सुजाता जाधव (वय 60), रेशमा वाघमारे (वय 18), रूपेश पवार (वय 9), निकिता पवार (वय 13), तारा पवार (वय 50), दिशा पवार (एक वर्ष).