नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
बुकीने संपर्क केल्यावरून बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनवर दोन वर्षांच्या बंदीचे प्रकरण ताजे असतानाच आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आपण तेव्हा मॅच फिक्सर्सच्या गराड्यात होतो, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ’मी त्या वेळी 21 जणांविरुद्ध खेळत होतो. 11 प्रतिस्पर्धी संघातील आणि 10 आमचे,’ असे शोएबने म्हटले आहे.
पाकिस्तानचे खेळाडू मोहम्मद आमीर, मोहम्मद आसिफ आणि सलमान बट्ट यांच्यावर स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदी घालण्यात आली होती. त्या वेळी पाकिस्तान क्रिकेट वादाच्या भोवर्यात सापडले होते, पण शोएबने मॅच फिक्सिंगची कीड किती खोलवर रुजली आहे हे आपल्या वक्तव्यातून सांगितले आहे.
एका टॉक शोच्या निमित्ताने शोएबने आपल्या मनातील ही खदखद बोलून दाखविली. तो म्हणतो की, ’मी कधीही पाकिस्तानची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला नाही. मॅच फिक्सिंगही केले नाही, पण मी मॅच फिक्सर्सच्या गराड्यात होतो. 21 जणांविरुद्ध मला खेळायचे होते. 11 प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू आणि 10 आमचेच. कोण मॅचफिक्सर होते याचा पत्ता लागत नव्हता.’
शोएबने सांगितले की, ’तेव्हा इतक्या प्रमाणात मॅच फिक्सिंग पसरले होते. आसिफने तर मला कोणते सामने फिक्स केले होते, कसे केले होते याचे वर्णन केले होते. आमीर आणि आसिफ मॅच फिक्सिंगमध्ये असल्याचे कळल्यानंतर मला प्रचंड राग आला होता, तर दुसरीकडे त्यांच्यासारखी गुणवत्ता वाया जात असल्याचे दुःखही होत होते. मी एवढा निराश झालो की त्या नैराश्यापोटी भिंतीवर ठोसाही लगावला.’
आमीर आणि आसिफ यांच्यासारखे अतिशय चांगले खेळाडू गैरमार्गाला लागल्याचे पाहून शोएबला वाईट वाटत होते. मुलाखतीत त्याने सांगितले की, थोड्याशा पैशांसाठी या खेळाडूंनी स्वतःला विकले. हे दोघेही बुद्धिमान आणि गुणी वेगवान गोलंदाज होते.