म्हसळा : प्रतिनिधी
समग्र शिक्षांतर्गत म्हसळा तालुक्यात कांदळवाडा, तुरूंबाडी खरसई, पाभरे आणि मेंदडी अशा शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारण्यात आली आहेत. शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी यासाठी समग्र शिक्षा प्राथमिक विभागामार्फत राज्यातील 35 जिल्ह्यांमधील निवडक शाळांत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारण्यात येत आहेत. म्हसळा तालुक्यात समग्र शिक्षांतर्गत 2019-20 या शैक्षणिक वर्षात कांदळवाडा व तुरूंबाडी येथे 2017-18मध्ये खरसई व पाभरे आणि 2018-19मध्ये मेंदडी अशा पाच शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारण्यात आली असल्याचे गट समन्वयक गजानन साळुंखे यांनी सांगितले. नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी शाळेत विद्युत जोडणी असलेली 500 चौरस फूट आकाराची आरसीसी स्लॅब असणारी वर्गखोली व गणित, विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नेमणूक आवश्यक असते.
कांदळवाडा येथील प्राथमिक शाळेत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी विविध प्रकारची विज्ञानाची सुमारे 10 लाख रुपये किमतीचे साहित्य आले आहे. त्यामध्ये पृथ्वीवरील दिवस-रात्र, न्यूटनची तबकडी, उष्णता प्रारण, धातूची विद्युत वाहकता, विविध ग्रहांवरील वजन असे अनेक प्रकार आहेत. शाळेतील विज्ञान शिक्षक शंकर परदेशी व उपशिक्षिका अश्विनी गुंडरे, मनीषा शिर्के, कासिम पठाण यांची मदत मिळत असल्याने विद्यार्थ्यांसोबतच काही पालकांनासुद्धा आता विज्ञानाची गोडी लागली आहे.
-शिवराम आडे, मुख्याध्यापक, प्राथमिक शाळा, कांदळवाडा, ता. म्हसळा
शाळेतील शिक्षक विज्ञान केंद्रात नवनवीन प्रयोग मन लावून शिकवतात. त्यामुळे भविष्यात तालुका विज्ञान प्रदर्शनात आमच्या शाळेचा चांगला सहभाग असेल.
-कुंजन पाखड व तेजस शिंदे, विद्यार्थी, प्राथमिक शाळा कांदळवाडा