पनवेल : रामप्रहर वृत्त
खारघर शहरातील पांडवकड्यावर बंदीचे आदेश असूनदेखील बंदी झुगारणार्या पर्यटकांवर खारघर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचालून 12 पर्यटकांना अटक करून त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. या पूर्वी 29 पर्यटकांवर खारघर पोलिसांनी कारवाई केली होती. विशेष म्हणजे कारवाई करण्यापूर्वी या 12 पर्यटकांपैकी काही पर्यटक वाहून जात असताना खारघर पोलिसांनी त्यांना वाहत्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले होते.
खारघरमधील पांडवकडा हा सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. या पांडवकड्याचे फेसळलेले पाणी अंगावर घेण्यासाठी मुबई, ठाणे, नवी मुंबईमधील प्रवासी दरवर्षी या ठिकाणी गर्दी करत आहेत. वाढत्या अपघातांमुळे पोलीस प्रशासन आणि वनखात्याने या धबधब्यावर बंदीचे आदेश घातले आहे, मात्र या बंदीच्या आदेशाला झुगारून देखील पर्यटक, धबधब्यावर पोलीस बंदोबस्ताला चकवा देऊन धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी जातात. जून महिन्यात पोलिसांना चकवा देऊन गेलेले पर्यटक पाण्यात अडकले होते. या पर्यटकांना वाहत्या पाण्यातून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले होते. त्यानंतर 14 जुलै रोजी 29 पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई केली होती. पुन्हा 12 पर्यटक या ठिकाणी दाखल झाले होते. यामधील काही पर्यटक हे पाण्यात वाहून जाताना खारघर पोलिसांनी त्यांना वाहत्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. या 12 पर्यटकांना अटक केली व जामिनावर सोडले.