बंदीची मुदत अखेर संपली; पर्यटकांची गर्दी वाढू लागली
माणगाव : सलीम शेख
तालुक्यातील भिरा येथील देवकुंड धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. ती उठविल्याने शुक्रवारपासून (दि. 1) या धबधब्याकडे पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. भिरा परिसरात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे मोठे धबधबे तयार होतात. देवकुंड येथेही असाच धबधबा आहे. त्याकडे जाणार्या रस्त्यावर एक नदी आहे. तेथे पूल नसल्यामुळे या नदीच्या पाण्यातून पर्यटकांना जावे लागते. देवकुंड धबधब्यात बुडून गेल्या वर्षी एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची पुनरावृत्ती घडू नये म्हणून माणगावच्या प्रांत अधिकारी तथा दंडाधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी 29 जून ते 31 ऑक्टेाबर या कालावधीत देवकुंड परिसरात जाण्यास पर्यटकांना बंदी घातली होती. त्यामुळे पर्यटकांच्या उत्साहाला काही अंशी चाप बसला होता. या बंदीची मुदत गुरुवारी संपल्याने पुन्हा या परिसरात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळणार आहे.
देवकुंड धबधबा
माणगाव तालुक्यातील भिरा येथे सह्याद्रीच्या कुशीत देवकुंड धबधबा असून त्यातून पाणी बारामाही खालील कुंडात पडते. त्यामुळे कुंडात खोल जलाशय तयार झाले आहे. या देवकुंडाला काही तरुणांनी भेट दिल्यानंतर तेथील निसर्गसौंदर्य सोशल मीडियावरून तसेच फेसबुक, इंटरनेटवरून प्रसिद्ध केले होते. त्यामुळे हे देवकुंड पाहण्यासाठी पर्यटकांचे लोंढे भिरा येथे येऊ लागले होते. अनेक सहली येऊ लागल्या होत्या. परिसरातील अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.