Breaking News

रायगडाला पावसाने झोडपले

अलिबाग : प्रतिनिधी

दिवाळीत चार दिवस सुट्टीवर गेलेल्या पावसाने नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी रायगडकरांना भिजविले. शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह अचानक आलेल्या या पावसाने रायगडकरांची तारांबळ उडविली. काही काळ तो चांगलाच रमला. येत्या 24 तासात रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदाचा मोसमी पाऊस उशिराने सुरू झाला आणि ऑक्टोबरनंतरही त्याचे अधूनमधून आगमन होऊ लागले. एकीकडे भातपीक कापणीला आलेली असताना या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. क्यार वादळानंतर महाचक्रीवादळाचे सावट निर्माण झाले आहे. क्यार चक्रीवादळाचा तडाखा रायगडच्या किनारपट्टीला बसला नाही. परंतु ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी बरसलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. हवामान खात्याने आता महाचक्रीवादळाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाचक्रीवादळाचे सावट उभे राहिले आहे. दरम्यान, गेले दोन दिवस वातावरणात अचानक बदल झाला आहे. शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी सूर्यदर्शन झाले तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर रायगड जिल्ह्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply