Breaking News

लसीकरणाची रंगीत तालीम

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना लशीची ड्राय रन

मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शनिवारी (दि. 2) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमधील 259 ठिकाणी कोरोना लसीकरणाचे ड्राय रन सुरू झालेे. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांत ही रंगीत तालीम घेण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लशीच्या भारतातील तातडीच्या वापरास केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील विशेष समितीने परवानगी दिली आहे. कोरोनाची लस देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाने मेगा प्लॅन तयार केला आहे.
या अंतर्गत ड्राय रन घेण्यात येत आहे. याआधी पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांत कोरोना लसीचे ड्राय रन यशस्वीपणे झाले. त्यानंतर आता संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यासाठी चाचपणी केली जात आहे. महाराष्ट्रातील काही आरोग्य केंद्रांत ही लसीकरणाची रंगीत तालीम झली. त्यामध्ये केवळ प्रत्यक्ष लस न टोचता लसीकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली गेली. सरते वर्ष कोरोना प्रादुर्भावात गेले, तर नवे वर्ष लसीकरणाचे असणार आहे.
’येत्या काही दिवसांत दोन-तीन लसींना मान्यता मिळेल’
नवी दिल्ली : येत्या काही दिवसांमध्ये भारतात कोरोनावरील दोन-तीन लसींना मान्यता मिळेल. लस आली तरी रोग दूर होईल असे नाही. त्यामुळे काळजी घेत राहणे आवश्यक असल्याचे मत विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. लसीकरणाच्या बाबतीत आपण मागे राहिलो आहे असे म्हणता येणार नाही. बाकी देशांमध्येही आताच पंधरा दिवसांपूर्वी लस टोचणी सुरू झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. शेखर मांडे म्हणाले की, लशीमुळे कोरोनाचं पूर्णपणे निर्मूलन होईल का हे आपल्याला माहिती नाही. इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आला आहे. त्याचे सतरा म्यूटेशन झाले आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या त्यावर काम केल्यानंतरच ते किती प्रभावी आहे हे समजेल, पण आता तरी त्या म्यूटेशनवर लस परिणामकारक असेल असे वाटते.
एक कोटी आरोग्य सेवक आणि दोन कोटी आघाडीच्या कोरोना योद्ध्यांना लस मोफत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात कोरोना लशीकरणाच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी जणांना मोफत लस दिली जाणार आहे. एक कोटी आरोग्य सेवा कर्मचारी आणि कोविड काळात पहिल्या फळीत काम करणार्‍या दोन कोटी कोरोना योद्धांना लस देण्यात प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी शनिवारी (दि. 2) येथे दिली.
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीकरणाची पूर्वतयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. या अंतर्गत देशभरात ड्राय रन घेण्यास सुरुवात झाली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात त्याचा आढावा घेतला.
पहिल्या टप्प्यात सर्वाधिक प्राधान्य असलेल्या तीन कोटी जणांना कोरोना लस मोफत देण्यात येणार आहे. यामध्ये एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि दोन कोटी फ्रंटलाइन कर्मचार्‍यांचा समावेश असेल, असे डॉ. वर्धन यांनी म्हटले आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी जणांना लस टोचली जाणार आहे. यापैकी तीन कोटी लोकांना मोफत दिली जाईल, तर प्राधान्यक्रमातील उर्वरित 27 कोटी जणांना लस कशी दिली जाईल याचा तपशील जुलैपर्यंत निश्चित केला जाणार आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
नागरिकांना आवाहन
या वेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देशातील नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. सुरक्षितता आणि लशीची कार्यक्षमता याची खात्री करणे याला आमचे प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply