Breaking News

‘पानिपत’च्या ट्रेलरमुळे अफगाणिस्तानमध्ये असंतोष

मुंबई : प्रतिनिधी

बॉलीवूडमध्ये एखादा ऐतिहासिक पट तयार होणार आणि त्यावरून वादंग उठणार नाही असे फार क्वचित प्रसंगी घडत असेल. त्या यादीत आता नंबर लागलाय तो आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि बहुचर्चित ’पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ चित्रपटाचा. या चित्रपटाभोवती वाद निर्माण होण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. ’पानिपत’मध्ये अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीची भूमिका कशी दाखवण्यात आली असेल यासंबंधी थेट अफगाणिस्तानातून चिंता व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानमध्ये अहमद शहा अब्दालीला मानणारा बराच मोठा वर्ग आहे. तिथे अब्दालीचा उल्लेख ’अहमद शाह बाबा’ असा केला जातो. त्यामुळे ’अहमद शाह बाबा’चे पात्र चित्रपटात नकारात्मक, क्रूर रंगवू नये, अशी मागणी अफगाणिस्तानकडून केली जात आहे. ’पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर संजय दत्तने साकारलेला अब्दाली लोकांना भावला. त्यामुळे या पात्राची चर्चाही होऊ लागली, मात्र याच चर्चांमुळे आणि चित्रपटामुळे अब्दालीचे चरित्र खराब होईल, अशी चिंता अफगाणिस्तानकडून व्यक्त केली जात आहे. इतकेच नव्हे, तर अफगाणिस्तानातील दूतावासाने भारताच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला याबाबत एक पत्रदेखील लिहिले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, आशुतोष गोवारीकरांच्या ’पानिपत’मध्ये अहमद शाह अब्दाली यांच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे वर्णन केल्यास अफगाणिस्तानातील नागरिकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. याचा परिणाम दोन्ही देशांतील संबंधांवर होईल, अशी चिंता या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत शाइदा अब्दाली यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, भारत-अफगाणिस्तानमधील संबंध मजबूत करण्यासाठी भारतीय चित्रपटांची महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा आपल्याकडे इतिहास आहे. ‘पानिपत’ चित्रपटाने या दोन्ही देशांच्या इतिहासाची ही गोष्ट लक्षात ठेवली असेल. अफगाणिस्तामध्ये अहमद शाह अब्दालीला ’राष्ट्रपिता’ मानले जाते. त्यामुळे ’पानिपत’ चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली जाऊ लागली. ’पानिपत’ च्या ट्रेलरनंतर अफगाणिस्तानमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. ’चित्रपटात अहमद शाह अब्दालीच्या पात्रासोबत योग्य न्याय झाला असेल, अशी आशा अनेकांनी व्यक्त केली आहे. अहमद शाह अब्दाली यांना क्रूर, नकारात्मक असं काही दाखवण्यात आले असेल, तर अफगाणिस्तान ते खपवून घेणार नाही, असा इशाराही काही नेटकर्‍यांनी दिला आहे. इसवी सन 1761मध्ये झालेले हे युद्ध भारताच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाचे युद्ध मानले जाते. पानिपतच्या याच युद्धाचा थरार चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर, अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार्‍या कलाकारांचे फर्स्ट लुक नुकतेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करण्यात आले होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply