Breaking News

‘लाल परी’ची अमृत महोत्सवी वाटचाल

’देखा ना है रे, सोचा ना है रे, रख दी निशाने पे जान.’ असे बॉम्बे टू गोवा चित्रपटात अमिताभ बच्चन अरूणा इराणीला गाडीत म्हणताना पाहून अनेक तरूणांना लालपरीतून प्रवास करताना एखाद्या सुंदर तरुणींला पाहून त्यावेळी हे गाणे गुणगुणावेसे नक्कीच वाटले असेल. त्याच्या आठवणी आजही त्यांच्या मनात असतील. या लालपरीमुळे एखाद्याला आपल्या स्वप्नातील परी मिळाली असेल किंवा तिला आपल्या स्वप्नातील राजकुमार सापडला असेल. कोणी आयुष्याचा जोडदार मिळवला असेल तर कोणाला चांगली नोकरीची संधी मिळाली असेल. प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्‍यात त्या आठवणी आज ही नक्कीच असतील. आज हे सगळं आठवण्याचे कारण म्हणजे आपल सगळ्यांची लाडकी लालपरी 75 वर्षांची झाली. खरे वाटत नाही ना.
स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात 1948 मध्ये बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रान्सपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला. बीएसआरटीसीची पहिली बस 1 जून 1948 यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू राहिला. एसटीची सेवा गाव तेथे एसटी, रस्ता तेथे एसटी या ब्रीदवाक्यानुरूप खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. महाराष्ट्रात सहा प्रादेशिक विभागातील 31 विभागातून एसटीचे विभागीय कामकाज केले जाते. त्याचप्रमाणे आंतरराज्यीय सेवा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा या राज्यातही एसटी महामंडळाकडून पुरविली जाऊ लागली.
सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी. आजही येथील जनता तिच्या प्रतीक्षेत अनेक तास उभी राहून चातका सारखी तिची वाट पाहत असते. मग चालक-वाहकांनी केलेला संप असो नाही तर गाडीतील बिघाड असो सामान्य माणूस तिची वाट पहातोच. एसटीने कालानुरूप खासगी सेवेच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या सेवेत बदल केला. साध्या गाड्या निमआराम बसगाड्यांसोबतच नव्या काळात आधुनिक सेवाही एसटीने सुरू केल्या आहेत. डिसेंबर 2002 मध्ये दादर-पुणे मार्गावर प्रथमच अश्वमेध या नावाने वातानुकूलित बससेवा सुरू केली. शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आराम सेवा प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरांदरम्यान चालवल्या नंतर आता ’शिवशाही’ वातानुकूलित बस सेवा सर्वत्र सुरू केली आहे. वाहक म्हणून महिलांची भरती करण्यात आली. आता तर महिलांच्या हातात स्टेरिंग ही देण्यात आले आहे. आज एसटीचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना पनवेल आगारातील काही कर्मचार्‍यांनी व्यक्त केलेल्या भावना तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत.

आज मी जी काही आहे ती एसटी मुळेच असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. माझे वडील एसटीत कामाला होते. त्यांचे निधन झाल्यावर 2013 मध्ये मी त्यांच्या जागेवर लागले. मी संगणक इंजिनियर आहे. एसटीत पगार कमी. माझ्या मैत्रिणी लाखो रुपये पगार घेत आहेत. त्यामुळे नातेवाईकांना मी एसटीत काम करू नये असे वाटते. आजही ते तुला दुसरीकडे चांगली नोकरी मिळेल म्हणतात, पण माझ्या आईची इच्छा वडिलांच्या जागेवर काम करावे, अशी असल्याने आणि मलाही मी इंजिनियर झाले ते वडिलांच्या एसटीतील नोकरीमुळेच याचा सार्थ अभिमान आहे. त्यामुळे मी एसटीत नोकरी स्वीकारली. सुरूवातीला मुंबई विभागीय कार्यालयात लागले काम नवीन होते, पण मला सगळ्यांनी सांभाळून घेतले. तेथून माझी पनवेलला बदली झाली. येथे माझ्याकडे काम लिखाणाचे आहे. संगणक इंजिनियर असलेली मी आज येथे अनेक पत्रे, अहवाल हाताने लिहिते, त्याची सवय झाली आहे. माझ्या वडिलांनी एसटीत नोकरी करून मला आणि भावाला इंजिनियर केले. भावाला चांगली नोकरी मिळाली. त्यामध्ये एसटीचा महत्वाचा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही.
-मंजूषा पवार, वरिष्ठ लिपिक

माझे वडील एसटीत वाहक म्हणून काम करायचे त्यांनी 22 वर्षे नोकरी केली. त्यावेळी लोकांना एसटी आपलीच वाटायची चालक-वाहकांबद्दल आपुलकी असायची, आदर वाटायचा आज लहान-लहान मुले पण भांडताना दिसतात हे पाहिल्यावर वाईट वाटते. त्यावेळी लोकांकडे पैसा नव्हता, पर्याय ही नव्हते. आम्ही शाळेत असताना वडा पाव खायचा असेल तर चालत जाऊन तिकिटाचे पैसे वाचवून वडा पाव खायचो. आज लोकांकडे पैसा आला आहे. त्यांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. माझ्या वडिलांना सगळ्यांना मदत करायची सवय होती. त्यामुळे त्यांनी पैसा जमवला नाही पण एसटीत नोकरी करताना माणसे जमवली. त्यांच्या नंतर मी 10 वी पास होऊन एसटीत लागलो. मी भावाला-बहिणींना शिकवले. बहिणींची लग्न केली. हे सगळे मी एसटी मुळेच करू शकलो. हे मी आणि माझे कुटुंब कधीच विसरू शकणार नाही.
-नदीम नालबंद, लेखाकार

मी एसटीत आलो ते इथे काम करताना थेट समाजाशी नाते जुळते म्हणून. पोलिसांप्रमाणेच इथे काम करताना सणवार नसतात. तुम्हाला एक सामाजिक देणे म्हणून काम करावे लागते. त्यावेळी तुमची मानसिकता महत्वाची असते. कोरोनाच्या काळात एसटीचे कर्मचारी कामावर होते. त्यांना वेळेवर पगार मिळत नव्हता तरीही अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना त्यांच्या कामावर पोहचवत होते. त्यामुळे अनेकांचे जीव निश्चितच वाचले आहेत. एसटीला उत्पन्नाचे बाहेरून कोणतेही साधन नसताना एसटी सेवा देण्याचे काम करीत आहे. कर्मचार्‍यांचा पगार एसटीच्या उत्पन्नावर अवलंबून असतो उत्पन्न वाढले तरच पगार वाढेल हे लक्षात घेऊन काम केले पाहिजे. एसटीच्या सुरूवातीच्या काळात चालक वाहक फारसे शिकलेले नव्हते, पण ते गाडीला लक्ष्मी मानत कामावर निघताना गाडीला नमस्कार करून गाडीत बसत आज ती मानसिकता दिसत नाही. एसटीत कमी पगारावर नोकरी करतोय ही मानसिकता बदलली तर अमृत महोत्सव साजरा करत असताना एसटीला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत.
-सुजीत डोळस, आगार प्रमुख, पनवेल

— नितीन देशमुख

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply