Breaking News

कोकणावर अवकृपा

कोकणापासून मुंबईपर्यंत किनारपट्टीचा मोठा पट्टा अतिवृष्टीचे संकट झेलत असताना राज्य सरकार नेमके काय करत आहे हा एक प्रश्नच आहे. निसर्ग चक्रीवादळ असो वा तौक्ते वादळ, या नैसर्गिक आपत्तींमध्ये भरडून निघालेल्या रायगड तसेच कोकणवासियांना आजही मदत मिळालेली नाही. महाड, चिपळूण परिसरात गुरूवारी आलेल्या महाप्रलयामध्ये नुकसान झेलणार्‍या नागरिकांनी मग सरकारकडून नेमकी काय अपेक्षा करावी हा प्रश्नच आहे.

परशुरामाची पवित्र भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोकणाच्या मागे निसर्ग जणु हात धुवून लागल्यासारखी परिस्थिती दिसते आहे. गेल्या वर्षभरात कोकणाला निसर्गाच्या रौद्र रूपाचा तिसर्‍यांदा फटका बसला आहे. आधी निसर्ग चक्रीवादळाने कोकणपट्टीला झोडपले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी तौक्ते वादळाने जाता जाता या भूभागाला जबरदस्त दणका दिला. कोरोना महामारीचे संकट कोकणवासियांच्या डोक्यावर अजुनही घोंघावते आहेच. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बुधवारी आणि गुरूवारी कोकणाला विशेषत: रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर परिसर तसेच चिपळूणला पावसाने बेदम झोडपले. चिपळूण, रत्नागिरी, खेड या परिसरामध्ये जलप्रलयाची स्थिती निर्माण झाली असून तेथील लोकजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. सर्वाधिक फटका चिपळूणला बसला असून शहरानजीकच्या वासिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केले आणि चिपळूण शहराचा परिसर काही तासांत जलमय करून टाकला. चिपळूणमधील बहुतेक ठिकाणे पाण्याखाली गेली असून किमान पाच हजार नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला आहे. चिपळूणवासियांसाठी एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डची मदत धाडावी असा टाहो तेथील आमदार-खासदारांना मुख्यमंत्र्यांकडे फोडावा लागला. तातडीने मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी संध्याकाळी सहा वाजेतोवर मदतीचा मागमूसही नव्हता. चिपळूण शहरातील अनेक मोटारी पाण्याच्या वेगवान प्रवाहामध्ये वाहून जातानाची दृश्ये वृत्तवाहिन्यांनी वारंवार दाखवली. वासिष्ठी नदीबरोबरच काजळी, मुचकुंदी या छोट्या-मोठ्या नद्यांनीही कहर केला आहे. खेड, रत्नागिरी या भागातही पुराच्या पाण्याने वाताहत झाली आहे. रायगड जिल्हा आणि तळकोकणाला आणखी दोन दिवस हवामानखात्याने रेड अ‍ॅलर्ट म्हणजेच धोक्याचा इशारा जारी केला आहे. कोकणातील विदारक परिस्थितीप्रमाणेच कोल्हापूर भागातही पुराचे पाणी थैमान घालते आहे. पंचगंगेने आपली इशारा पातळी केव्हाच ओलांडली आहे. कोकणातील परिस्थिती भीषण असली तरी गेले दोन-तीन दिवस निम्म्या महाराष्ट्राला झोडपून काढणारा पाऊस काही चांगल्या बातम्या देखील घेऊन आला. उदाहरणार्थ महानगरी मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात धरणांपैकी चार धरणे भरून वाहू लागली आहेत. तसेच महाराष्ट्राची पाणपोई म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याची खबर आहे. नंदूरबार नजीकचा काही पट्टा सोडला तर महाराष्ट्रात बव्हंशी ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांवरील दुबार पेरणीचे संकट टळेल अशी आशा आहे. महानगरी मुंबई ही दर पावसाळ्यात अनेक भोग भोगत असते. तिच्यासोबत नजीकचे ठाणे आणि नवी मुंबईचा इलाखाही तितकाच मनस्ताप भोगत असतो. काही तासांच्या अवधीत मुंबई परिसराला लुळेपांगळे करून सोडणार्‍या पावसापुढे राज्य सरकारने बहुदा हात टेकले आहेत. आजवरचा अनुभव पाहता सरकारी यंत्रणा वादळग्रस्त वा पूरग्रस्तांसाठी फार काही करू शकणार नाही असेच वाटते. निसर्गाचा प्रकोप आणि सरकारी अनास्था या दोन संकटांमध्ये जगत राहण्याची सवय आता जनतेने करून घ्यायला हवी.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply