खालापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील नावंढे गावातून केळवली रेल्वे स्थानकाकङे जाणार्या रस्त्यावर सोमवारी ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले होते. मात्र या बिबट्याने पावसाळी वाढलेल्या गवतातून धूम ठोकली होती. गुरुवारी (दि. 14) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास केळवली गावाच्या शिवारात रेल्वेमार्ग ओलांडून बिबट्याने जांभरूंग गावाकडे धूम ठोकल्याचे ग्रामस्थांनी पाहिल्याने केळवली, खरवई, जांभरूंग गावात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
सोमवारी नावंढे परिसरात ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर खालापूर वनविभागाचे अधिकारी व पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी बिबट्याचे पायाचे ठसे घेण्यात आले होते. त्यावरून बिबट्या अंदाजे चार ते पाच वर्षाचा असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. भक्ष्याच्या शोधात तो नावंढे परिसरात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. या परिसरातील पुरूषभर उंचीच्या गवतात बिबट्या नक्की कुठे लपला असावा, याचा अंदाज येत नव्हता. वनविभागाचे पथकही तळ ठोकून होते. ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. असे असताना गुरुवारी संध्याकाळी पुन्हा या परिसरातील खोपोली-मुंबई रेल्वेमार्ग ओलांडणार्या बिबट्याचे ग्रामस्थांना दर्शन झाले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
नावंढे, केळवली गावांच्या परिसरात माळरानावर मोठ्या प्रमाणात गवत उगवले असून, झाडीझुडपात हा बिबट्या लपला असावा, अशी शंका आता व्यक्त करण्यात येत आहे. तर जांभरूंग, ठाकुरवाडी, मंकीहिल या परिसरात घनदाट जंगल असून हा बिबट्या सुरक्षितपणे बोरघाटातील जंगलात गेला असावा, असाही अंदाज काही ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.