खालापूर : प्रतिनिधी
खोपोली शिळफाटा येथून कामावरून घरी चाललेल्या एका महिलेवर बुधवारी (दि. 13) सायंकाळी तीन ते चार बिहारी तरूणांनी धारदार चाकूने हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या महिलेने आरडाओरडा केल्याने हल्लेखोर पळून गेले. सदर महिलेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलांवर हल्ला करण्याची ही तिसरी घटना असल्याने शिळफाटा परिसरात खळबळ उडाली आहे.
खोपोली नगरपालिका हद्दीतील डोंगरावरती मिल धनगरवाडा आहे. तेथील जाईबाई चंद्रकांत ढेबे (वय 42) या बागेश्री हॉटेलमध्ये कामाला आहेत. त्या नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी कामावरून घरी चालत जात होत्या. मिलगाव येथील शंकर मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या तीन ते चार जणांनी अंधाराचा फायदा घेत जाईबाई यांच्यावर पाठिमागून धारदार चाकूने हल्ला केला. त्यात जाईबाई यांच्या डोक्यात, मानेवर तसेच डाव्या खांद्यावर गंभीर जखमा झाल्या. जखमी जाईबाईंनी जीव वाचविण्यासाठी आरडाओरड केली, ती ऐकून परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत हाल्लेखोरांनी पळ काढला.
जखमी जाईबाई यांचा मुलगा भिमसेन याने त्यांना मोटारसायकलवरून खोपली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात दाखल केले, त्यानंतर त्यांना पुढील तपासण्यांसाठी कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात हालविण्यात आले. या प्रकरणी खोपोली पोलिसांनी संशयित म्हणून अरूण राधा दास (मुळ रा, बिहार, सध्या रा. खोपोली) याला ताब्यात घेतले असून, तपासादरम्यान अरसन सौदीउद्दीन आलम, औरंगजेब अताफ आलम, अली मैनुद्दीन शेख (तीघेही मुळ रा. माधवपुर बिहार, सध्या रा. शिळफाटा) या हल्लेखोरांची नावे समजली असून ते फरारी आहेत. त्यांच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक निरीक्षक वलसंंग करीत आहेेत.