Breaking News

संरक्षण दलातील रुग्णालयातील औषधांची खुल्या बाजारात विक्री

पनवेल : वार्ताहर : संरक्षण दलासह शासकीय रुग्णालयात मोफत वितरणासाठी असलेली औषधे बेकायदेशीररीत्या मिळवून, सदर औषधे खुल्या बाजारात विक्री करणारी टोळी सक्रीय असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नुकतेच तळोजा व सानपाडा येथील औषधांच्या पेढीवर टाकलेल्या छाप्यावरुन उघडकीस आले आहे.

 नवी मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने देखील या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या तीघा डिस्ट्रीब्युटर्सना अटक केली आहे. या रॅकेटमध्ये संरक्षण दलातील काही अधिकार्‍यांचा समावेश असल्याचा संशय असून त्यानुसार गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. संरक्षण दल अथवा शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत वितरीत करण्यात येणारी काही औषधे ही सानपाडा येथील श्री समर्थ डिस्ट्रीब्युटर्स या एजन्सीकडून तसेच तळोजा येथील मे. मेडलाईफ इंटरनॅशनल प्रा.लि. विक्री करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यामुळे या पथकाने गत जानेवारी महिन्यामध्ये सानपाडा आणि तळोजा येथील दोन्ही एजन्सीच्या पेढीला प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली होती. या तपासणीत संरक्षण दलातील रुग्णालयासाठी असलेली औषधे सदर पेढीमध्ये आणली जाऊन सदर औषधे या पेढीमार्फत खुल्या बाजारात विकण्यात येत असल्याचे आढळुन आले होते. त्यामुळे सदर पथकाने या पेढीतून मोठ्या प्रमाणात शासकीय औषधांचा साठा देखील जप्त केला आहे. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी औषधांच्या बॅचवरुन विक्री झालेल्या औषधांची मोजदाद केली असता, या एजन्सीमार्फत तब्बल 14 लाख 62 हजार रुपये किंमतीची संरक्षण दलासाठी असलेली औषधे विकण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरुन सानपाडा व तळोजा पोलिसांनी दोन्ही औषध पेढीच्या चालक मालकांवर फसवणूकीसह, बनवाटगीरी, औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसाधन अधिनियमानुसार गुन्हा दाखल केले आहेत. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने तपास करुन या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या महेश शिवशंकर नागणसुरे (36)रा. भवानीपेठ,सोलापुर, सचिन विष्णू वडसकर (29) रा.माहुर जि.नांदेड आणि सचिन पुरुषोत्तम बलदवा (37) रा.घाटकोपर या तीघांना अटक केली आहे. संरक्षण दलातील औषधांचा काळाबाजार करणार्‍या रॅकेटमधील औषधांच्या डिस्ट्रीब्युटर्संना पकडण्यात यश आले असले तरी या रॅकेटने संरक्षण दलातील कुठल्या रुग्णालयातून सदरची औषधे मिळविली. तसेच या रॅकेटमध्ये संरक्षण दलातील कोण व किती अधिकारी सहभागी आहेत? याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त तुषार दोशी यांनी सांगितले. त्यासाठी दिल्ली येथे एकपथक रवाना करण्यात आल्याचे देखील दोशी यांनी सांगितले. संरक्षण दलासाठी जी औषधे शासनाकडून घेतली जातात, त्या औषधांवर डीफेन्स सप्लाय, इएसआयएस सप्लाय, दिल्ली गव्हर्नमेंट सप्लाय, नॉट फॉर सेल असे छापण्यात येते. मात्र सदर औषधांच्या डिस्ट्रीब्युटर्सकडे आल्यानंतर ते सदर औषधांच्या कार्टन बॉक्सवर व लेबलवरील डीफेन्स सप्लाय, इएसआयएस सप्लाय, दिल्ली गव्हर्नमेंट सप्लाय हे थिनरच्या सहाय्याने खोडून ती औषधे एमआरपी प्रमाणे खुल्या बाजारात विकत असल्याचे आढळुन आले आहे.  औषधे विकून मिळणारी रक्कम या रॅकेटमध्ये सहभागी असलेले सर्वजण वाटून घेत असल्याचे  आढळुन आले आहे.

Check Also

भव्य कटआऊट्स; चित्रपटाचं मोठेपण त्यातही

आज सगळीकडेच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ची जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपट शौकिनांपासून इतिहासाचे अभ्यासक आपापल्या पद्धतीनुसार …

Leave a Reply