अटीतटीच्या लढतीत विंडीज संघावर मात
गयाना : वृत्तसंस्था
भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजला सलग चौथ्या सामन्यात धूळ चारली. पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ नऊ षटकांच्या झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 50 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला केवळ 45 धावाच करता आल्या आणि अटीतटीच्या सामन्यात भारत 5 धावांनी विजयी झाला.
विंडीज महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 9 षटकांत भरभर धावा जमवण्याच्या प्रयत्नात भारताने तब्बल 7 गडी गमावले. भारताच्या पूजा वस्त्रकारने सर्वाधिक 10 धावांची खेळी केली. विंडीजच्या मॅथ्यूजने 2 षटकांत 13 धावा देत 3 बळी टिपले आणि भारताच्या डावावर अंकुश लावला. फ्लेचर आणि ग्रिमंड या दोघींनी तिला चांगली साथ देत प्रत्येकी दोन बळी मिळवले.
51 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांचाही गोंधळ उडाला. मॅथ्यूज (11), हेन्री (11) आणि मॅकलीन (10) या तिघींनी भारताच्या आव्हानाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सामना जिंकता आला नाही. शेवटच्या षटकात विंडीजला विजयासाठी 13 धावांची आवश्यकता होती. त्या वेळी दुसर्या आणि पाचव्या चेंडूवर अनुजा पाटीलने बळी घेतले. त्यामुळे भारताला सामना जिंकणे सोपे गेले. अष्टपैलू कामगिरी करणार्या मॅथ्यूजला सामनावीर घोषित करण्यात आले.