नवी मुंबई : प्रतिनिधी
कोपरखैरणे सेक्टर 10 येथील सागर सोसायटीत राहणार्या चित्रलेखा अरुरू यांच्या घरातील छताचे प्लॅस्टर मंगळवारी (दि. 7) दुपारी कोसळले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसले, तरी सिडकोच्या धोकादायक घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सेक्टर 10 मधील सागर को-ऑपरेटीव्ही सोसायटीत अरुरू कुटुंब राहते. चित्रलेखा अरुरू या घरात असताना अचानक जोरात आवाज झाला. अरुरू यांचे कुटुंबीय घाबरून बाहेर आले असता बाहेरील रूमच्या छताचे संपूर्ण प्लॅस्टर खाली कोसळलेले दिसले. आतील सळ्यासुद्धा गंजल्याने आतील सिमेंटसुद्धा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेने या इमारतीतील रहिवासी सुद्धा धास्तावले आहेत. याआधी देखील कोपरखैरणेत अनेक इमारतींचे प्लॅस्टर कोसळण्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे सिडकोच्या धोकादायक इमारतींची बांधणी कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. याबाबत शिवसेनेचे नगरसेवक रामदास पवळे यांनी भेट दिली. पवळे यांनी सांगितले की, अनेकदा या इमारतीतील प्लॅस्टर कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या सिडकोने बांधलेल्या इमारतींना 27 वर्षे झालेली आहेत. पुनर्बांधणीसाठी पाठपुरावा सुरू आहे, मात्र पालिकेनेदेखील नागरिकांना सहकार्य करावे.