रोह्याच्या डोंगराळ भागात धावले रायगडातील नामवंत डॉक्टर्स
रोहा : प्रतिनिधी
सातारा मॅरेथॉनपेक्षाही धावण्यासाठी कठीण असलेल्या रोह्यातील डोंगराळ भागात आरएमए मॅरेथॉन 2019 अत्यंत उत्साहात झाली. या वेळी रायगड मेडीकल असोसिएशनच्या वतीने रन फॉर फीटनेसचा संदेश देण्यात आला, तसेच निरामय स्वास्थ्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे व्यायाम केला पाहिजे, धावले पाहिजे हेही या मॅरेथॉनच्या माध्यमातून रायगडमधील डॉक्टर्सनी जनतेला सूचित केले.
सकाळचे अत्यंत आल्हाददायक वातावरण, कार्यक्रमाचे नेटके आयोजन, ठराविक विशिष्ट अंतरावर धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी ढोल ताशाचा गजर, आकर्षक व लक्षवेधी स्वागतकमानी, सेल्फी पॉइंट्स यामुळे ही मॅरेथॉन वेगळ्या उंचीवर गेली. रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे या मॅरेथॉनचे व्यवस्थापन करण्यात आले होते. उपस्थित डॉक्टर्सनी उपक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले.
सकाळी 6 वाजता मॅरेथॉनचा उद्घाटन सोहळा झाला. या वेळी व्यासपीठावर रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र जाधव, आरएमए मॅरेथॉनचे चेअरमन डॉ. अशोक जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने, रोह्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलचे अध्यक्ष गणेश सरदार, उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर आदी उपस्थित होते. साईश्री हॉस्पिटलचे डॉ .रवी केराळकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ झाला.
3, 5, 10, 21 किमीसाठी डॉक्टर्सनी उदंड प्रतिसाद दिला. रायगडातील अनेक नामांकित डॉक्टर या मॅरेथॉनमध्ये धावताना दिसले. रोह्याचे हृदयरोगचिकित्सक डॉ. अशोक जाधव, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्यासह 20हुन आधिक स्पर्धकांनी 21 किमीची मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली, तर सुमारे 450 स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेऊन आपला सहभाग नोंदवला.
सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र, पदक व प्रत्येक गटातील विजेत्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण सूत्रसंचलन अजित तेलंगे, निखिल दाते व राकेश कागडा यांनी केले.