एकेकाळी भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील भाताचे कोठार रिकामे होत चालले आहे. अतिवृष्टी आणि लहरी हवामानामुळे तसेच मोठ्या प्रमाणात जमिनींची विक्री आणि भातशेती परवडत नसल्याने होत असलेले स्थलांतर यामुळे भातजमिनींकडे शेतकर्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे या भात जमिनीवर कशेळ (कशेड) या गवताने आक्रमण करून ताबा मिळवला आहे. यामुळे महाडसह शेजारील माणगाव, पोलादपूरमधील या तालुक्यातील जवळपास लाखो हेक्टर शेती नापीक झाली आहे, तर शेतकरी हवालदिल झाला असून दरवर्षीच नुकसान सोसावे लागत असल्याने शेती करणे सोडून द्यावे अशी द्विधा मनस्थिती शेतकर्यांची झाली आहे.
महाडमध्ये जवळपास 20 हजार हेक्टर भातशेती असून शासन दरबारी कागदोपत्री 12,500 हेक्टर एवढी भातशेती लाडवडीखाली आहे, मात्र सद्यस्थितीत हा आकडा कमी झाला असून हजारो हेक्टर भातपिकाची शेती उजाड आणि नापीक झाली आहे. महाड तालुक्यात विशेषतः खाडीपट्टा भागात हजारो हेक्टर शेतजमिनीवर गवत उगवले आहे, तसेच खाडीचे खारे पाणी शिरल्यामुळे जमिनीतील क्षाराचे प्रमाण वाढल्याने नापीक झाली आहे. पावसाळ्यात उगवणारे हे गवत, माणसापेक्षा उंच राक्षसी असलेले हे गवत
उन्हाळ्यातदेखील तग धरून असते. ऐन पावसाळ्यात सुकून गेले असे वाटणारे गवत पुन्हा उभारी घेते. या गवताला ग्रामीण भागात कशेळ किंवा कशेड म्हटले जाते. याची बी वार्याबरोबर आणि पुराच्या पाण्यासोबत जाऊन इतरत्र पडते. विशेष म्हणजे वनव्यात आगीमध्येदेखील हे बी नष्ट होत नाही. पावसाळ्यात ते प्रचंड वेगाने वाढ घेते. पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे या गवताचे बी आता तालुक्यात सर्वदूर पसरत चालले आहे. हळूहळू या गवताचे जणू रोपट्यात रूपांतर झाल्यासारखे होते. वेगाने वाढत गेलेले हे गवत शेतकर्यांना आता डोकेदुखी ठरत आहे. महाड खाडीपट्टा भागातील दादलीपासून थेट वराठी गाव आणि दासगावपासून
दाभोळपर्यंत या गवताचा प्रादुर्भाव दिसून येतो. सव, गोठे, कुंबळे, रावढळ, तुडील, जुई, चिंभावे, महाड शहरालगत करंजखोल, गंधारपाले, वहुर, दासगाव, लाडवली, मोहोप्रे, तेटघर, आचळोली, नाते, नांदगाव, तेटघर गावातील शेतीमध्येदेखील या गवताची लागण झाली आहे. भातपीक रोपांच्या तरव्यातही हे गवत उगवत असल्याने आणि लवकर नष्ट होत नसल्याने शेतकरी या गवताच्या प्रादुर्भावाने हैराण झाला आहे. गावातील घराशेजारील मोकळी जागा, नाले आणि गटारांजवळ, शेताचे बांध आदी ठिकाणी या गवताने आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
महाडमधील खाडीपट्टा हा विभाग एकेकाळी भाताबरोबरच कडधान्ये पीक घेण्यात अग्रेसर होता. भातपिकाबरोबरच मासेमारीदेखील केली जात होती. महाड औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी याच भागात खाडीपट्टा भागात टाकले जात असल्याने या भागातील भातशेती आणि खाडी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली. नोकरीच्या शोधात तरुणांचा लोंढा मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे वाढला आणि गावातील घरे ओस पडली. मजुरांची कमतरता आणि वाढती महागाई पाहता घरातील वृद्ध माणसे जमेल तेवढी शेती करू लागले आणि बाकीची भातजमीन पडीक राहू लागली. गावातील जमिनी ओस पडल्या आणि या भात जमिनीत कशेळ गवताने ताबा मिळवला. महाडसह माणगाव तालुक्यातदेखील कशेळ गवताने भातशेतीला विळखा घातला आहे. यामुळे भातशेतात शेतकर्यांना जाण्यासाठी वाटदेखील राहिली नाही. कृषी विभागाच्या उपाययोजना आणि मार्गदर्शनदेखील कागदावरच राहिले आहे.
गावातील वयोवृद्धांनी याबाबत सांगताना प्रत्येक घरातील तरुण वर्ग मुंबईला गेला आहे. यामुळे शेतीकडे पाहायला कोणाला वेळ नाही. सोन्यासारखी शेती ओस पडल्याचे दुःख होते, मात्र करायचे काय? एका शेतकर्याची किमान तीन एकर शेती या कशेळने बाद झाली आहे. जमेल तेवढे गवत आम्ही जाळून टाकतो. त्यामुळे त्याचे बी मरून जाईल आणि शिल्लक जमिनीवर हे गवत येत नाही, मात्र हे बियाणे पूर्ण जळून जात नाही. यामुळे ते पुन्हा रुजण्यास मदत होते, असेही शेतकरी सांगतात. या भागात कडधान्य पीक भातपिकानंतर मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. येथील कडधान्यांना मोठी मागणीदेखील होती. काळाच्या आड ही कडधान्य शेती नामशेष होऊ लागली. या
कडधान्यांवरदेखील अमरवेलीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. त्यापाठोपाठ आता कशेळची डोकेदुखी वाढली आहे. कृषी विभागाने या गवतावर ठोस उपाय केल्यास हजारो एकर भातजमीन पुन्हा एकदा मोकळा श्वास घेईल. ही स्थिती केवळ खाडीपट्ट्यातच दिसून येते असे नाही, तर महाडजवळील बिरवाडी, कोल, कोथेरी, नाते आदी विभागांतदेखील या गवताचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कशेळ (कशेड) या राक्षसी गवत आणि अमरवेलांच्या प्रादुर्भावाने हैराण झालेला महाडचा शेतकरी सततचे पूर, अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळेदेखील बेजार झाला आहे. नैसर्गिक आपत्तीने महाड तालुक्यातील सात हजार शेतकर्यांची 2,322 हेक्टर भातशेती आणि आंबा बागायतीचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. हा आकडा पंचनामे झालेल्या शेतकर्यांचा आहे. याउपर आजही हजारो शेतकर्यांचे पंचनामेच झाले नाहीत. तसेच पीकविमा काढलेल्या शेतकर्यांना अद्याप या विमा कंपन्यांनी नुकसानीचे चेक दिले नाहीत. कोकणातील शेतकरी हा सहनशील आहे. तो सर्व संकटे हसत सहन करतो. याचा दोष देवाला किंवा सरकारला न देता आपल्या नशिबाला कोसत बसतो, मात्र खचून जाऊन आत्महत्या करीत नाही.
-महेश शिंदे