टोकियो ः वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉम हिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. सहा वेळा विश्व चॅम्पियन असलेल्या ‘सुपर मॉम’ मेरीने अंतिम 16मध्ये प्रवेश केला आहे. मेरीने डोमिनिकाच्या मिगुएलिना हर्नांडेज हिला 4-1ने पराभूत केले. मणिपूरची 38 वर्षीय मेरी कोम टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय दलाची ध्वजवाहक होती. तिची ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा असणार आहे. यापूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरीने कांस्यपदक पटकाविले होते. मेरीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 51 किलो वजनी गटात भाग घेतला आहे. मेरीचा पुढचा सामना 29 जुलैला आहे. कोलंबियाच्या तिसर्या मानांकित वालेंसिया विक्टोरियाशी तिची लढत असणार आहे. मेरी कोमचा 2003मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. 2006मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता तसेच 2009मध्ये भारतीय खेळातील सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने तिचा सन्मान करण्यात आला होता. ती भारताची शान आहे.
ऑस्ट्रेलियाची भारतावर मात
टोकियो ः टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचा दारुण पराभव झाला आहे. ग्रुप एमधील दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 7-1ने पराभूत केले. भारताचा ऑलिम्पिक इतिहासातील हा लाजिरवाणा पराभव आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ सुरुवातीपासून आक्रमक खेळी करताना दिसला. या सामन्यात भारतीय संघाची बचाव फळी कमकुवत दिसली. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 3-2ने पराभूत केले होते. त्यानंतर दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 7-1ने पराभव सहन करावा लागला. आता भारताचे पुढील सामने स्पेन, अर्जेंटिना, जापान या संघासोबत आहे. आता स्पर्धेतील अस्तित्व टिकवण्यासाठी भारताला हे तिन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे.